MARG Institute For SELF Development

MARG Institute For SELF Development समस्येपासून ते उत्तरापर्यंतचा प्रवास

*मना तळमळसी..!  लेखांक 10.*     मुलांचा *"व्यक्तिमत्त्व विकास"* हा विषय आज-काल मुला-पालकांच्या मानगुटीवर भुतासारखा बसलेल...
16/08/2023

*मना तळमळसी..! लेखांक 10.*

मुलांचा *"व्यक्तिमत्त्व विकास"* हा विषय आज-काल मुला-पालकांच्या मानगुटीवर भुतासारखा बसलेला दिसतो. आपण मुलांसाठी, जास्तीत जास्त काय काय करू शकतो, कोणकोणत्या सोयी सुविधा त्यांना आपण पुरवू शकतो, त्यांच्यासाठी किती पैसे खर्च करू शकतो, हे प्रश्न म्हणजे आपल्या मुलांवरील प्रेमाच्या फूटपट्ट्या झाल्या आहेत. या सर्व भौतिक सोयीसुविधा, महागडे क्लासेस, सुट्टीतील छंदवर्ग, या गोष्टींपुरतेच फक्त, आपले त्यांच्या विकासासाठीचे प्रयत्न मर्यादित आहेत का? आणि हे केलेले प्रयत्न पुरेसे आहेत का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी मुळातूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे.
बरेचदा आपल्याला, *'व्यक्तिमत्त्व'* या शब्दाचे नीट असे आकलन झालेलेच नसते. काही ढोबळ कल्पना आपण मनात धरून चालतो. काही जण माणसाच्या बाह्य रूपालाच व्यक्तीमत्व असे म्हणतात. काही जणांना असे वाटते की, अनेक गोष्टी अवगत असणे म्हणजे चांगले व्यक्तिमत्त्व. म्हणून मग मुलांना अनेक गोष्टी शिकवण्याचे अट्टहास दिसतात. स्केटिंग, गिटार, चित्रकला, गायन, तबला, वक्तृत्त्व, पोहोणे, पियानो, आणि जोडीला पुन्हा शाळेचा अभ्यास असतोच. अशा भारंभार क्लासेसना दिवसभर हजेरी लावून, मुलांचे चिमुकले शरीर, चिमुकला मेंदू, आणि चिमुकले मन, अगदी पार शिणून, दमून जातात. इतके की, शेवटी एवढं सगळं करूनही, मुलांच्या पदरात काहीच पडत नाही.
चटपटीत इंग्रजी बोलता येणे, आणि नवीन माणसांशी धीटपणे संवाद साधता येणे, म्हणजे चांगले व्यक्तिमत्व, असे काहींना वाटते. त्यातूनच मग ...
"कॉन्व्हेंट मधली मुलं कशी स्मार्ट होतात, त्या मानाने मराठी शाळेतील मुलं अगदीच घाटी वाटतात नाही"
-असे सार्वत्रिक गैरसमज पसरतात. या सर्व गोष्टी व्यक्तिमत्त्वात समाविष्ट असतातच. पण अशी एखादीच गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व, असे म्हटल्यास, आंधळे आणि हत्ती या गोष्टी सारखे होईल. व्यक्तिमत्त्व ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. तांत्रिक व्याख्येत न अडकता, आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू.
*"व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अशा सर्व वैशिष्ट्यांचा संच म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व."* या संचात शारीरिक वैशिष्ट्यांचा समावेश असतोच. पण त्यांना अगदी थोडे महत्त्व असते. व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे व्यक्तीच्या वर्तन वैशिष्ट्यांचा. माणसाच्या एकूणच क्रियात्मक, आणि प्रतिक्रियात्मक वर्तन वैशिष्ट्यांचा संच, म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्त्व असं म्हणता येईल.
आपल्या आसपासच्या लोकांशी माणूस कसा वागतो, समूहात त्याला इतरांशी जमवून घेता येतं का? अनोळखी माणसांशी सामना झाल्यास त्याची वागण्याची पद्धत कशी असते? जेव्हा मनाविरुद्ध घटना घडतात तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असते? ताणतणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगात तो कसा वागतो? त्याला स्वतःच्या भावना नीटपणे स्पष्ट शब्दात व्यक्त करता येतात का? या सगळ्या गोष्टी नीटपणे करता येणे हे विकसित व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची सर्वात मोठी शाळा म्हणजे घर. आणि त्यासाठी तयार, उपलब्ध असणारी 'आदर्श मॉडेल्स' म्हणजे आई आणि बाबा. आईबाबा मुलांशी कसे वागतात, आईबाबा मुलांच्या देखत एकमेकांशी कसे वागतात, आणि आईबाबा मुलांदेखत इतरांशी कसे वागतात, या सर्व वागण्याच्या पद्धती म्हणजे मुलांसाठी व्यक्तीमत्व विकासाचे धडे असतात. या प्रक्रियेला विकास म्हणण्यापेक्षा खरे तर व्यक्तिमत्त्वाची घडण असे म्हणणं अधिक अर्थपूर्ण होईल. मुलं शिकतात कशी..? हा एक मुळातूनच समजून घेण्याचा विषय आहे. एखादी घटना पाहणे, अनुभवणे, ती समजून घेणे, तिचा अर्थ लावणे, आणि नंतर तसाच प्रसंग जेव्हा त्यांच्या आयुष्यात घडेल, तेव्हा त्याला तोंड देताना, मागच्या प्रसंगात मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करणे, अशी ही प्रक्रिया असते. एका उदाहरणाने ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल.
नऊ वर्षांच्या अभिजीतच्या बाबांच्या मित्राला त्यांच्या मदतीची गरज होती. त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात, त्यांची बाजू मांडून मध्यस्थी करण्यासाठी, त्यांनी अभिजीतच्या बाबांची मदत मागितली. बाबांनी होकार दिला, आणि या रविवारी आपण जाऊ म्हणून कबूल केले. पण त्याचवेळी बाबांना आपण अभिजीतला दिलेल्या प्रॉमिस चा विसर पडला. रविवारी आपण जवळच्या किल्ल्यावर पिकनिकला जाऊ, असे प्रॉमिस बाबांनी अभिजीतला आणि त्याच्या आईला केले होते. पण चुकून, त्यांनी मित्रालाही, त्याच रविवारची सकाळची वेळ दिली. मग ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळीच त्या काकांचा फोन आला. घरात त्यावेळी पिकनिक ची तयारी चालू होती. मोबाईल मध्ये त्यांचा फोन आलेला पाहून, बाबांना, झालेला गोंधळ लक्षात आला. मग त्यांनी काय केले...?
प्रथम, त्यांनी आलेला फोन अभिजीतच्या आईला घ्यायला सांगितला. अभीचे बाबा टॉयलेट मध्ये आहेत, दहा मिनिटांनी फोन करतील असे सांगायला सांगितले. मग त्यानंतर त्यांनी अभि, आणि त्याची आई यांना, झालेला गोंधळ, व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितला. स्वतःची चूक कबूल करून, त्याबद्दल सॉरी म्हटले. आणि आपल्या पिकनिकपेक्षा, काकांचं काम कसं महत्त्वाचं आहे, हे त्यांना समजून सांगितलं. अभि अगोदर नाराज झाला, पण पुढच्या रविवारचं प्रॉमिस मिळाल्यानंतर राजी झाला. मग बाबांनी मित्राला फोन करून त्यांचा पुढचा कार्यक्रम ठरवला.
आता या प्रसंगातून, अभिजीत काय काय शिकला असेल? अनेक गोष्टी आहेत. अशा प्रसंगांची नोंद आपल्या मेंदूत, नेणीवेच्या पातळीवर होत असते. अभिजीतने शिकलेल्या गोष्टींपैकी, पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या हातून काही चूक झाल्यास, ती कबूल करावी. अजिबात लपवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, झालेली चूक निस्तरण्यासाठी, आपल्या माणसांकडे मोकळ्या मनाने मदत मागावी. संकोचू नये. तिसरी गोष्ट म्हणजे, घरात दिलेला शब्द महत्त्वाचा असतोच, पण समाजात दिलेल्या शब्दाला कधी कधी जास्ती महत्त्व द्यावे लागते.
थोडा बारकाईने विचार केल्यास, असे लक्षात येते की, यातल्या काही गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. गंभीर आहेत. वरील प्रसंग जरी छोटासा असला, तरी त्यातल्या काही गोष्टींमुळे मिळणारा धडा, हा आयुष्यामध्ये, अतिशय गंभीर अशा समस्या सोडवताना, योग्य पद्धतीने विचार करण्याची, आणि वागण्याची सवय लावणारा आहे. गेल्या काही वर्षात, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात, ही गोष्ट महत्त्वाची होती. या मुलांच्या घरातील वातावरण असे असावे की, त्यांना तशी मदत मागण्याची हिंमतच झाली नसावी. किंवा त्यांना तशी खात्री वाटली नसावी. स्वतःची चूक कबूल करणे, आपण अडचणीत असताना आपल्याच माणसांकडे न घाबरता मदत मागणे, अशा सवयी माणसाला संकट काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदतीच्या ठरू शकतात. मदत मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, असं वाटल्यासच माणूस अगदी अगतिक होतो. आणि तेव्हाच तो आत्महत्या सारख्या गंभीर पर्यायाची निवड करण्याची शक्यता निर्माण होते.
______________________________
-- *विवेक दसरे.*
*मानसतज्ञ.*
*मार्ग इन्स्टिट्यूट फॉर सेल्फ डेव्हलपमेंट,*
*अहमदनगर.*
*9881659901*

मार्ग इन्स्टिट्यूट आयोजित करत आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव वर्कशॉप.....! आपल्या करिअर विषयी जागरूक असणाऱ...
09/04/2023

मार्ग इन्स्टिट्यूट आयोजित करत आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव वर्कशॉप.....!

आपल्या करिअर विषयी जागरूक असणाऱ्या, आजच्या विद्यार्थ्यांना, स्वतःचे करिअर यशस्वीपणे घडवण्यासाठी,
" स्व " विकास साधण्यास मदत करणारे...
एक परिपूर्ण वर्कशॉप..!
Develop Your Career...
By ... Developing Your "SELF"

वैशिष्ट्ये --
• परिपूर्ण, मूलभूत अभ्यासक्रम.
• कौशल्य विकासावर भर.
• अतिशय मर्यादित प्रवेश

स्वतःचे करिअर यशस्वीपणे घडवण्यासाठी आजचं कॉल करा
9881659901

मार्ग इन्स्टिट्यूट आयोजित करत आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव वर्कशॉप.....! आपल्या करिअर विषयी जागरूक असणाऱ...
09/04/2023

मार्ग इन्स्टिट्यूट आयोजित करत आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव वर्कशॉप.....!

आपल्या करिअर विषयी जागरूक असणाऱ्या, आजच्या विद्यार्थ्यांना, स्वतःचे करिअर यशस्वीपणे घडवण्यासाठी,
" स्व " विकास साधण्यास मदत करणारे...
एक परिपूर्ण वर्कशॉप..!
Develop Your Career...
By ... Developing Your "SELF"

वैशिष्ट्ये --
• परिपूर्ण, मूलभूत अभ्यासक्रम.
• कौशल्य विकासावर भर.
• अतिशय मर्यादित प्रवेश

स्वतःचे करिअर यशस्वीपणे घडवण्यासाठी आजचं कॉल करा
098816 59901

*”रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी"* यांच्या 2022 - 23 च्या *तेजोमय* या अनियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला, माझा 'मानसिक आ...
24/02/2023

*”रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी"* यांच्या 2022 - 23 च्या *तेजोमय* या अनियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला, माझा 'मानसिक आरोग्य' विषयक लेख -
*जगू आनंदे* 👇
________________________________________________________

*जगू आनंदें..!*

*'वयाच्या तिसाव्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू....'*

*'25 वर्षांच्या तरुणीची आत्महत्या .......'*

अशा अनेक बातम्या माध्यमातून रोजच पाहायला मिळतात सद्ध्या. तरुणपणी केल्या जाणाऱ्या आत्महत्या, हृदयविकाराने मृत्यू ,अशा घटना, जरा जास्तच घडत आहेत ना एवढ्यात?
अगदी वयाच्या 35 व्या वर्षी पॅरालिसिस झाल्याच्या केसेस सुद्धा दुर्मिळ नाहीत सद्ध्या. सहजच दिसतात आसपास.
हे सगळं का घडतंय? माणसं अकालीच का थकतायत ?म्हणजे जगणं त्यांना मानसिक दृष्ट्या इतकं दमवतं आहे का? असू नये, असं आपल्याला कितीही वाटलं, तरी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थीच आहे.
जगणं इतकं कठीण का होतंय? एवढी जीवघेणी कुतरओढ का करतो आपण स्वतःची? या प्रश्नांची उत्तरं अगदी गंभीरपणे, आणि प्राधान्याने शोधण्याची वेळ आली आहे, असं आपल्या सर्वांनाच वाटायला हवं.
माणसं एवढी अस्वस्थ का आहेत, तरुण मुलं इतकी असहाय्य होऊन हार का मानतायत? या अस्वस्थतेची कारण आजच्या जगण्याच्या संघर्षातच आहेत.
*"मला जे हवं आहे ते"*
आणि
*"मला जे मिळतं आहे ते"*
यातली तफावत मला सारखी अस्वस्थ करत असते. म्हणजे मला 'जे मिळालं' ते मला कधीच पुरेसं वाटत नाही. किंबहुना ते, मला मिळाल्याक्षणापासूनच त्याकडे मी दुर्लक्ष करतो. माझा सगळा फोकस असतो, तो मला अजून काय मिळालं 'नाहीये' याच्यावर.
मग मी काय करतो, तर मी सगळ्या शक्तीनिशी, खरंतर असलेली आणि नसलेलीही शक्ती, पणाला लावून, पळायला लागतो. कधीही पहा, मी आपला सारखा पळतच असतो. कधी विश्रांती नाही, कुठे करमणूक नाही, कुठे नातेवाईकांच्या, आपल्या माणसांच्या, मित्रांच्या आनंदात- दुःखात सहभागी होणं नाही. मी आपला पळतच असतो.
बरं मी एकटा पळत नाही. तर बरोबर इतर अनेकांना पळवत असतो. माझे सहकारी, माझ्या हाताखाली काम करणारे माझे टीम मेंबर, माझ्या घरातली माणसं, या सगळ्यांनाच माझ्यासह मी पळवत असतो. त्यांच्या कुवतीचा विचार न करता. या पळापळीत कुठेतरी, कुणीतरी, असा असतोच, की, ही पळापळ न पेलवून त्याची छाती फुटते. आणि तो मागं पडतो, किंवा थांबतो.
मग आपण सर्व पळणारे मिळून त्याला पराभूत ठरवतो. तसा शिक्का त्याच्या कपाळावरती मारून मोकळे होतो. इथे प्रश्न एवढाच असतो, की पळणारांनी थांबणा-यावर मारलेला हा 'पराभूत' चा शिक्का, थांबणारा स्वीकारतो आहे, का नाही. त्याने हा शिक्का स्वीकारला, की तो स्वतःच्याही नजरेतून उतरतो. मग पुन्हा एकाचा प्रवास सुरू होतो, नैराश्य, व्यसन, आजारपण, आत्महत्या, अकाली मृत्यू, किंवा याहूनही भयंकर असे एकाकी निराश जीवन याकडे.
पण जो थांबला त्याच्याकडे पाहायला, पळणाऱ्यांना कुठे वेळ आहे. ते आपले पळतच असतात. मात्र गंमत अशी असते की, या पळापळीत जे टिकलेले असतात आत्तापर्यंत, त्यांना तेच यश वाटायला लागतं. मोजकेच काही भाग्यवान असतात, त्यांना समजतं की, या पळण्याला अंतच नाहीये.
बरं ही सगळी पळापळ चालली आहे कशासाठी? तर 'मला जे हवं आहे ते' मिळवण्यासाठी. मगाशी म्हटलं तसं 'मला जे मिळतंय ते' आणि 'मला जे हवं आहे ते' यातलाच हा सगळा झगडा असतो.
पुढची गंमत म्हणजे 'मला जे हवं आहे' ते मी ठरवतो कसं? आणि याहूनही मूलभूत प्रश्न असा की, ते 'मी' ठरवतो का इतर कुणीतरी ठरवतं? माझे विचार, माझी तत्त्व, माझ्या गरजा, आज माझा मीच ठरवतोय, का दुसरे कोणी ठरवतंय? दुर्दैवानं आज हे सगळं ठरवतोय तो म्हणजे *"बाजार .!"*
आपली सगळ्यांची आयुष्य अदृश्यपणे नियंत्रित करणारी ही महाप्रचंड ताकदवान, आणि सर्वव्यापी शक्ती म्हणजे आजचा बाजार. हा बाजार आजची जगण्याची मूल्य ठरवतोय. आपल्या गरजा काय आहेत हे आपल्याला हा बाजारच सांगतोय. "Cooool जगणं" म्हणजे कसं असतं, ते आपल्याला हा बाजार सांगतो. एक खोटी आभासी दुनिया, सातत्याने आपल्या भोवती नाचत नाचत, आपल्याला भारून टाकते. तो आवाजच आपल्याला सत्य वाटायला लागतो. आणि मग एका आभासी, बेगडी दुनियेत, खोट्या आभासी गरजांच्या पूर्तीसाठी, आपण कुत्र्यासारखे धापा टाकत, केवळ पळत असतो.
मग पुढचा मुद्दा असा येतो की, आपण स्वतःला या सगळ्यापासून वाचवू शकतो का? या सगळ्यात सामील न होता आपण जगू शकतो का? हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्याला आजच्या भाषेत *key question* म्हणतात, तसा आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर निश्चितच "नाही" असं आहे.
आजची समाजमाध्यमं ही आपल्या जगण्याचा कणन् कण व्यापून राहिलेले आहेत. त्यांच्यापासून तुम्ही स्वतःला वाचवणं तर सोडाच, पण त्यांच्याशिवाय जगणं सुद्धा अशक्य व्हावं अशी परिस्थिती आहे. या सर्वव्यापी, सर्वशक्तिमान समाजमाध्यमांच्या मार्फत, उपभोगवादाचा भस्मासूर आपल्या जगण्यात ठाण मांडून बसला आहे. तुम्हाला सातत्याने नवीन नवीन वस्तूंच्या मोहात पाडणं, त्या तुम्हाला कशा गरजेच्या आहेत ते, तुम्हाला सहज पटेल, अशा पद्धतीने समजून सांगणं, हे सातत्याने घडत असतं. आणि मग या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक पैसा कमावणे हे ओघाने आलंच.
मग पैसा हे *साधन* न राहता, तोच *साध्य* होऊन बसतं. यावर उपाय काय? या सगळ्यातून आपण कोरडं तर राहू शकत नाही. मग काय केलं पाहिजे? चुकतंय नेमकं काय? लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर अगदी गंभीरपणे, आणि प्राधान्याने शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मग या प्रश्नाचे उत्तर शोधायचे ठरवलं तर ते शोधणार कुठे, आणि कसं?
आजच्या काळात जगण्यासाठी पैसा लागतो हे निश्चितच. आणि तो पूर्वीपेक्षा खूप अधिक प्रमाणात लागतोय हेही खरं. पण, तो कमवत असताना, तो आपण कशासाठी कमवतोय, याचंच भान हरपत चाललंय असं दिसतं. पैसा कमावणे, अधिकाधिक पॅकेजची पोझिशन मिळवणं, प्लेसमेंट मिळवणं, हेच प्रतिष्ठेचं आणि त्यामुळे महत्त्वाचं होऊन बसलंयं.
म्हणजे पैसा हे जगण्याचे *'साधन'* न राहता, जगण्याचे *"साध्य"* होऊन बसलंय का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. पैसा कमावण्याच्या शर्यतीत धावताना, माणसं अधिकाधिक आत्मकेंद्रित, आणि एकटी होत चालली आहेत. पैसा कशाला लागतो? तर जगण्यासाठी. पण हे "जगणं" म्हणजे काय याचाच आपल्याला विसर पडलेला आहे.
आपण जगण्याच्या व्याख्येत, केंद्रस्थानी केवळ "मीच" शिल्लक आहे. मी, माझी बायको किंवा नवरा, आणि आमचे एकच मुल, हे आजचं जगण्याचं वर्तुळ दिसतं. आता आयटी सारख्या क्षेत्रांमध्ये तरुण मुलांचा नवीन फंडा, म्हणजे 'डिंक ( D**K )' म्हणजे 'डबल इन्कम नो किड्स'. यामध्ये तर इतर नात्यांमधील भावनिक गुंतवणूक जवळ जवळ नष्ट झालेली दिसते.
समाधानी आणि दीर्घ आयुष्य जगण्याबद्दल जागतिक पातळीवर एक सर्व्हे केला गेला. त्यात, कोणत्या घटकांमुळे माणसं समाधानी आयुष्य जगतात हे शोधण्याचा प्रयत्न झाला. पैसा, भौतिक सुख, व्यावसायिक यश, अशा सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा जगण्यात समाधान, आणि आनंद निर्माण करणारी गोष्ट, म्हणजे "भावनेच्या ओलाव्याने जपलेले नातेसंबंध" हाच घटक सगळ्यात महत्त्वाचा ठरला.
आपल्या जगण्यात केवळ 'माझ्या' जगण्यापेक्षा 'माझ्या माणसांसह' जगणं याला अधिक महत्त्व आहे. आपल्या कुटुंबासाठी झटण्यात तर मोठं समाधान असतंच. पण माझ्या कुटुंबाचं हीत जपताना या *'आपलेपणाची व्याप्ती'* वाढवणं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे.
अधिकाधिक माणसांशी जोडलं जाणं, त्यांच्याशी भावनिक धागा जोडून, त्यांना स्वतःच्या जगण्याशी जोडून घेणे, ही अतिशय समाधान निर्माण करणारी गोष्ट आहे.
नेमकं याच ठिकाणी आपण कमी पडतोय. आजच्या आपल्या जगण्यातला आत्मकेंद्रितपणा हा आपल्याला बाकीच्या माणसांपासून अधिकाधिक लांब घेऊन जातोय. त्यामुळे नवीन पिढीतील मुलांना, इतर माणसांसह, त्यांच्याशी जमवून घेऊन राहण्याची सवयच नाही. प्रत्येक घरात एकच मुल. त्यामुळे आई-वडिलांचे संपूर्ण अवधान, त्यांचा पैसा, त्यांचे प्रेम, त्या एकाच बाळाच्या वाट्याला येतं. त्यामुळे आपल्या वस्तू, आणि आपली माणसं, दुसऱ्याशी शेअर करण्याची गरजच पडत नाही. आणि त्यामुळे त्याची सवयही होत नाही.
त्यातलाच अधिक महत्त्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे, इतरांबरोबर राहायची वेळच येत नसल्याने, त्यामुळे इतरांबरोबर राहण्यासाठी आवश्यक ती *भावनिक, सामाजिक कौशल्ये* विकसितच होत नाहीत. इतरांबरोबर जमवून घेणे, त्यांचं म्हणणं मान्य करणे, प्रसंगी स्वतःच्या मताला, इच्छेला, मुरड घालणे, यांची त्या मुलांना सवयच होत नाही. प्रत्येक घरातलं मूल हे त्या घराचा जणू अनभिषिक्त सम्राटच. आणि आई बाप हे त्यांचे गुलाम. "मुलं ऐकतच नाहीत हो" ही तक्रार जी घराघरात ऐकू येते, त्याला कारणीभूत हीच परिस्थिती असते.
किंवा अनेक ठिकाणी अगदी याच्या विरोधी चित्र असतं. आई-बाबांच्या सगळ्या स्वप्नांचा ओझं या बाळाच्या खांद्यावरती. सारखं जपणं, सुरक्षा देणे, हे करू नको, तिकडे जाऊ नको, वगैरे गोष्टींनी त्याच्यातलं बालसुलभ कुतूहलच पूर्ण मारलं जातं. सगळे निर्णय आईबापांनीच घेतल्यामुळे, निर्णय घेण्याचं कौशल्यच विकसित झालेलं नसतं. त्यातून एक 'आत्मविश्वासहीन व्यक्तिमत्व' निर्माण होतं. यातूनच पुढे घुसमट, नैराश्य, आत्महत्या, किंवा घटस्फोट यासारख्या गंभीर घटना घडतात.
यातली एक गोष्ट महत्त्वाची आहे की, आपली *जगण्याची व्याख्या,* आपल्या जगण्यातील समाधानाची पातळी निश्चित करत असते. म्हणून आपण आपली जगण्याची व्याख्या पुन्हा एकदा, *साध्य - साधन विवेका* चा वापर करून, निश्चित केली पाहिजे. पैसा हवाच. त्याच्याशिवाय जगणं शक्य नाही. पण तोच जर साध्य होऊन बसला तर जगणंच राहून जातं. आपली जगण्याविषयीची मूल्यं, आणि आपल्या गरजा, यांवर असलेला बाजाराचा प्रभाव झटकून, जरा सुटं होऊन, शांत मनानं विचार करायला हवा.
जगताना, निसर्गाने माणसाच्या जगण्यासाठी निर्माण केलेल्या जैविक प्रेरणांचा आदर हा व्हायलाच हवा. म्हणजे नेमकं काय? आजकाल करिअर करण्याचं एक मोठं भूत निर्माण झाला आहे. मुलामुलींमध्ये करिअर करण्यासाठी, लग्न पुढे ढकलण्याची, किंवा लग्नच न करण्याची एक पद्धत दिसते. यातून काय होतं की, वय वाढतं तशा शारीरिक गरजा त्रास देऊ लागतात. त्या योग्यवेळी शमल्या नाहीत, तर व्यक्तिमत्त्वात दोष निर्माण होतो. उशिरा लग्न झालं, तर मुलं व्हायला अडचण निर्माण होते. वंध्यत्त्व, व त्यावरील उपचार, त्यासाठी लाखात येणारा खर्च, हे सगळं भावनिक दृष्ट्या अतिशय वेदनादायी असतं. अगदी उध्वस्त करणारंही असू शकत. लग्नच न करता एकटंच राहण्याचा निर्णय अनेक जण घेतात. विशेषतः मुलींच्या बाबतीत ही समस्या जास्त दिसते. मग त्यातून शारीरिक गरजेसाठी मुक्त शरीर संबंध हे आलेच. किंवा मग कोंडमारा. Live in relationship हा त्यातलाच एक मार्ग. पण या सर्वातून निर्माण होणारी एकमेव, आणि अत्यंत गंभीर गोष्ट, म्हणजे भावनिक एकटेपणा, कोंडमारा, आणि उद्ध्वस्तपणा.
तरुणपण उताराला लागलं, की मग उरलेलं आयुष्य, एकटेपणा इतका खायला उठतो, की जगणंच व्यर्थ वाटू लागतं. त्यामुळेच, आता या सगळ्यांचा, अगदी मुळापासून, आणि प्रामाणिकपणे पुनर्विचार करायला हवा आहे. *डोळसपणा आणि विवेक* ही या विचारांसाठीची साधनं आहेत. आणि *प्रामाणिकपणा* हा या विचारांची बैठक आहे. या सगळ्यासाठी स्वतःला बदलण्याची तयारी हवी. सुदैवाने आज आपल्याकडेसुद्धा यासाठी व्यावसायिक तज्ञ मंडळी मदतीसाठी उपलब्ध आहेत. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपला प्राधान्यक्रम, भावनिक अडचणी, नातेसंबंधातील ताण, यासाठी आता आपण व्यावसायिक मानसशास्त्रीय समुपदेशकांची मदत घेऊ शकतो.
गरज आहे फक्त डोळसपणे एक पाऊल उचलण्याची....!
समाधानी जगण्याच्या दिशेने...!

-- *विवेक दसरे.*
*मानसतज्ञ.*
*मार्ग काउन्सिलिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर,*
*अहमदनगर.*
*9881659901*
__________________________________________

*मना तळमळसी..! लेखांक ७.* *विवाहपूर्व समुपदेशन .*        माणसाने काही फारच सुंदर गोष्टी निर्माण केल्या आहेत. नातेसंबंध ह...
10/02/2023

*मना तळमळसी..! लेखांक ७.*
*विवाहपूर्व समुपदेशन .*
माणसाने काही फारच सुंदर गोष्टी निर्माण केल्या आहेत. नातेसंबंध ही त्यातलीच एक फार सुंदर गोष्ट आहे. एरवी माणसाला बंधने आवडत नाहीत. तो स्वातंत्र्य - प्रिय प्राणी आहे. पण अगदी 'दागिन्याप्रमाणे मिरवावे' असे बंधन म्हणजे लग्न. 'आई आणि मूल' हे नैसर्गिक नातं सोडलं, तर निसर्गातील दुसरे एकमेव आदिम आणि नैसर्गिक नातं म्हणजे 'नर आणि मादी.' हे खरंतर केवळ जीवशास्त्रीय नातं आहे. पण उत्क्रांतीच्या आणि सामाजिकरणाच्या प्रक्रियेत, नर आणि मादी या आदिम, जीवशास्त्रीय नात्याला माणसाने व्यवस्थेच्या, आणि असीम प्रेमाच्या कोंदणात बसवून, सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवलं आहे. जणू मानवी संस्कृतीचा तो परमोच्च बिंदूच मानावा.
एकमेकांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याची बांधिलकी बांधणारे, 'पती-पत्नी' हे नाते आहे. लग्न हे माणसाच्या आयुष्यात घडणारे सर्वात मोठे स्थित्यंतर आहे. बाकीची नाती ही रक्ताची असतात. आई-वडील, भाऊ बहीण, ही सर्व अशी रक्ताची नाती. लग्नापूर्वी, या आपल्या माणसांसह राहताना, त्यांना 'आपलं' मानावं लागत नाही. ती माणसं आपली असतातच. पण लग्न ही अशी घटना असते, की जी, संपूर्णपणे परक्या असणाऱ्या एका व्यक्तीला, तुमच्या सर्वात जवळ आणून ठेवणार असते. या ठिकाणी 'आपलं मानणं' म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं असतं.
पती-पत्नी या नात्यात असणारी समर्पित अशी बांधिलकी दुसऱ्या कोणत्याच नात्यात आढळत नाही. माणूस आई-वडिलांची सेवा करतो, भाऊ बहिणीवर प्रेम करतो. पण ही नाती एकतर आयुष्याच्या एका टप्प्यावर संपणार तरी असतात, किंवा त्यांच्या संदर्भातील आपली जबाबदारी काही प्रमाणात मर्यादित होणार असते. पण बहुतांश संस्कृतींमध्ये पती-पत्नी हे नातं आयुष्यभर निभावलं जाणारं नातं आहे. लग्न करताना, या नात्याच्या व्यापकतेची, खोलीची, एक प्रगल्भ जाणीव निर्माण होणे आवश्यक असते. नाहीतर अनेक अडचणी निर्माण होतात.
लग्नामुळे माणसाचं आयुष्य संपूर्णपणे बदलत असतं. कालपर्यंत पूर्णपणे स्वच्छंद जगणारे, तरुण मुलगा आणि मुलगी, अचानक एकमेकांशी पती-पत्नीच्या नात्याने बांधले जातात. काया, वाचा, मन, अशा सर्व पातळीवर एकमेकांना स्वीकारून, धर्म, अर्थ, काम, अशा सर्व क्षेत्रात सहजीवनाचे वचन घेऊन - देऊन, लग्नाचे बंधन स्वीकारले जाते. या नात्यामुळे निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्या ओळखून, स्वीकारून, पार पाडण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये अनेक बदल घडवावे लागतात. काही जणांमध्ये हे बदल अगदी सहज घडतात. तर अनेक जणांमध्ये हे बदल घडताना रेल्वेचे रूळ बदलताना होते तशी, काहीशी खडखड सुद्धा होते. हे अगदी नैसर्गिक असते.
माध्यम क्रांतीमुळे, संपूर्ण जग, पूर्वी कधी नव्हे एवढे जवळ आलं आहे. जगातील अनेक वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव, आजच्या पिढीच्या जगण्यावर थेटपणे पडतो आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या 'मतामतांच्या गलबल्यात' नेमके काय बरोबर, आणि काय चूक, हे ठरवणे, तरुणांसाठी जास्त जिकिरीचे होत आहे. लग्नाच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. लग्नामुळे निर्माण होणाऱ्या नात्याचा, आणि जबाबदारीचा स्वीकार करून, ती पेलण्यासाठी, पूर्वी कधी नव्हे एवढी, मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. विवाहपूर्व समुपदेशनाच्या रूपाने असे मार्गदर्शन आज उपलब्ध होत आहे.
समाजातील अनेक गोष्टी आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. त्यांचा परिणाम वैवाहिक नात्यांवर सुद्धा होतो आहे होतो आहे.उदा. 'लिंग भूमिका'. पूर्वी प्रत्येक संस्कृतीत व्यक्तीच्या लिंगावरून तिच्या कुटुंबातील भूमिका निश्चित होत असत. पुरुष आणि स्त्रीच्या भूमिका ठरलेल्या असत. त्यामध्ये बदलाचा प्रश्न फारसा उद्भवत नव्हता. पुरुष-प्राधान्य बहुतांश स्वीकारलेले होतेच. पण आधुनिक काळात, सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत, स्त्री-पुरुष समानता हा नव्याने पुढे आलेला मुद्दा आहे. अजूनही, समाज पुरुष-प्राधान्य मानत असला, तरी, समानतेचा विचार मांडला जाऊन, काही प्रमाणात आचरणातही येत आहे. म्हणजेच हा बदलाचा आणि संघर्षाचा काळ आहे. त्यामुळे आपल्या होणाऱ्या जोडीदाराचे या संबंधातील विचार, आणि अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेणे, (लग्नापूर्वीच) आवश्यक झाले आहे.
लग्न-संबंधातील अनेक विषय असतात, की ज्याबाबत समुपदेशकाच्या मदतीने अगोदर चर्चा केली, तर ती फारच मार्गदर्शक होऊ शकते. लग्न आणि जोडीदार या संदर्भातील आपल्या कल्पना, अपेक्षा, आणि प्रत्यक्षातील वास्तव, या दोन्हीत जर तफावत असेल, आणि ती भरून काढता आली नाही, तर लग्नानंतर आयुष्यात दुःखच निर्माण होते. आजकाल चित्रपट क्षेत्राच्या प्रभावामुळे तरुणांच्या, -आणि तरुणींच्या सुद्धा, प्रेमाबद्दलच्या कल्पना, कधीकधी फारच स्वप्नाळू असतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र कठोर वास्तव असते. लग्न, लग्नानंतरचे आयुष्य, सासरची नवीन नाती, त्या नात्यामुळे येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या, त्या संदर्भातील समाजात असणाऱ्या अपेक्षा, प्रत्यक्ष नवदांपत्याच्या इतरांकडून, आणि एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा, नवीन घरातील वातावरण, इत्यादी अनेक गोष्टी समुपदेशकाच्या मदतीने जाणून घेतल्यास, ते फारच उपयोगाचे ठरू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्न, आणि आपला साथीदार, याबद्दलचा आपला नेमका दृष्टिकोन, (शास्त्रीय शब्द- अभिवृत्ति, attitude) काय आहे, याबद्दल बऱ्याच जणांना जाणीवच नसते. समुपदेशकाबरोबर केलेली चर्चा या संदर्भात उपयोगाची ठरते.
अजून अनेक विषयात समुपदेशन मार्गदर्शक ठरू शकते. उदाहरणार्थ एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, स्वभाव, दोन्ही घरातील मूल्यकल्पना, नात्यातील बांधिलकीच्या, एकनिष्ठतेच्या कल्पना, समायोजन कौशल्ये, मुले कधी होऊ द्यायची, त्यांचं पालनपोषण, आर्थिक परिस्थिती, आणि भविष्यातील आर्थिक नियोजन, जोडीदारावर प्रेम करण्याच्या संकल्पना, आणि अपेक्षा, जोडीदाराची भावनिक वैशिष्ट्ये, धार्मिकतेच्या कल्पना, अशा अनेक विषयांची चर्चा होऊ शकते.
लग्न करू इच्छिणाऱ्या मुला मुलींच्या दृष्टीने, अतिशय महत्त्वाचा, आणि अतिशय नाजूक असा विषय म्हणजे, त्यांचे विवाहोत्तर लैंगिक सहजीवन. लैंगिक संबंधांबद्दलचे घोर अज्ञान, आणि त्याबद्दल अनेक भोंगळ, अतिरकी कल्पनांची कडबोळी बाळगणारा तरुण वर्ग, हे आपले सामाजिक वास्तव आहे. लैंगिक संबंधांबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती, लैंगिक सहजीवन, याचा पती-पत्नीतील भावनिक नात्यावर पडणारा प्रभाव, या सर्व गोष्टी, खरे तर प्रत्येक विवाहेच्छुक जोडप्याने, समुपदेशकाकडे जाऊन जाणून घेतल्या पाहिजेत. ज्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतात, अशांपैकी बहुतांश संघर्षांच्या मुळाशी लैंगिक जीवन हेच कारण असते. त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या, आणि नाजूक विषयावर समुपदेशकाशी मोकळेपणाने चर्चा करणे नेहमी व अतिशय फायद्याचे ठरते.
विवाहपूर्व समुपदेशन हे अशा प्रकारे सुखी आणि समाधानी वैवाहिक आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून उपयोगी पडू शकते.
-- *विवेक दसरे.*
*मानसतज्ञ.*
*मार्ग काउन्सिलिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर,*
*अहमदनगर.*
*9881659901*

11/02/2022

आजच्या जगण्यातील आव्हाने, त्यामुळे अनुभवास येणारे असमाधान, अस्वस्थता, आणि आपल्या मनाची होणारी अगतिक अवस्था हे सगळं आपण अनुभवतो आहोत. यासाठी आपल्याला मदत करु शकणारा एक परिणामकारक उपाय म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन. आपल्या जगण्यातील विविध अडचणी आणि त्यासाठी समुपदेशनाची होणारी मदत यांचा परिचय करुन देणारी ही लेखमाला सुरु करीत आहे. आपला प्रतिसाद मला हुरुप देणारा असेल.

*मना तळमळसी ...! लेखांक १.*

आधुनिक काळातील माणसाचं जगणं पूर्वी कधी नव्हे एवढं बदललं आहे. आजच्या पिढीचं जगणं आणि आपल्या अगोदरच्या पिढीचं जगणं यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. कॉम्प्युटरच्या एका क्लिकच्या मदतीने इथे भारतात बसलेले आजोबा आपल्या अमेरिकेतल्या नातवाशी सहज गप्पा मारू शकतात. तंत्रज्ञानातील या बदलांचा वेगही अगदी झपाटून टाकणारा आहे. इतका की काल आलेलं तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरत आहे. पूर्वीच्या शेकडो वर्षांच्या अस्थिर जगण्याने संस्कृती म्हणून स्थापित झालेले माणसाच्या जगण्याचे सारे संकेत आज कालबाह्य ठरावेत अशी परिस्थिती निर्माण होते आहे. बदल, वेग, आणि स्पर्धा हे आजच्या युगाचे परवलीचे शब्द बनले आहेत.
बदल, वेग, आणि स्पर्धेमुळे बाहेरच्या जगाबरोबर माणसाचं भावविश्व सुद्धा कधी नव्हे इतके ढवळून निघालं आहे. त्यामुळे मानसिक, भावनिक, समस्यांचं किंवा त्याहूनही गंभीर अशा मनोविकारांचे आणि मनोकायिक आजारांचे प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसतं. पाव शतकापूर्वी उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे मनोकायिक आजार; हे क्वचित आढळणारे श्रीमंती आजार होते. पण आज पस्तिशीच्या पुढच्या पिढीत सुद्धा हे आजार सहजरीत्या आढळतात. आधुनिक मानसशास्त्राने माणसाच्या जगण्यातील या बदलांची, समस्यांची दखल घेऊन त्यांचा अगदी सूक्ष्मतेने अभ्यास केला. त्या सोडवण्यासाठी अनेक उपचार पद्धती शोधून काढल्या. त्यातलीच एक प्रभावी उपचारपद्धती म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन (सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग). या लेखमालेतून आपण याच उपचारपद्धतीची अधिक विस्तृत ओळख करुन घेऊ.
आपण वापरतो ती सर्व वाहने जरी स्वयंचलित असली, तरी ती चालवण्यासाठी चालकाची म्हणजे ड्रायव्हरची आवश्यकता असते. अगदी त्याच प्रकारे आपल्याला ही आयुष्यभर आपलं मन चालवत असतं. गंमत म्हणजे आपल्याला हवं तिथं ते आपल्याला नेईलच याची अजिबात खात्री नसते. त्याला मध्येच कुठेतरी; बरेचदा नको तिथं, गुंतून पडण्याची सवय असते. या प्रवासात लहान-मोठे अपघात तर रोजचेच. म्हणजे आपण ठरवतो एक, आणि आपलं मन आपल्या हातून वेगळीच गोष्ट घडवतं.
आठवण्याचा प्रयत्न करून पहा. कितीतरी वेळा आपल्याला असं वाटतं की आपण असे कसे वागलो..? काहीतरी होतं, कोणीतरी काहीतरी म्हणतं; आणि अगदी अचानक आपण अतिशय स्फोटक रीतीने रिअॕक्ट होतो. आपल्या या रिएक्शनचे परिणाम पुढे बरेचदा फारच वाईट होतात. नंतर आपल्याला असं वाटत राहतं, की आपण असे कसे वागलो? आपल्याला नेमकं काय झालं होतं? किंवा बरेचदा एखादा विचार प्रसंग आपला पिच्छा सोडत नाही. आपल्याला खरं तर तो झटकायचा असतो. पण नाही. सोडतच नाही तो आपल्याला. मग आपल्या वागण्यावर, कामावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. कौरव-पांडवांच्या दोन सेनासागरांमध्ये निराश होऊन, हातपाय गाळून बसलेल्या अर्जुना सारखीच आपली अवस्था होते अगदी.
आपलं मन आपल्यावर कशी हुकुमत गाजवतं, अन् त्याची वागण्याची पद्धत नेमकी कशी असते, हे समजण्यासाठी आपल्याला मुळातूनच मन ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आणि हीच तर सर्वात अवघड कामगिरी आहे. मन समजून घेण्यासाठी तर माणूस हजारो वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील काही थोर मंडळींना ते उमगले सुद्धा. पण ज्यांना ते उमगलं त्यांच्या हेही लक्षात आलं की हा अगदीच वैयक्तिक आणि व्यक्तिगत अनुभव आहे. इतका, की तो इतरांच्या जाणिवेला आणताच येत नाही. म्हणजे मग तुमच्या माझ्यासारख्या पामराची अवस्था, स्वतःचच शेपूट पकडून पाहणाऱ्या कुत्र्यासारखी होते अगदी. आपण मनाच्या मागे, आणि तो पठ्ठ्या आपला पुढेच.
याच्यावर उपाय सापडला तो आधुनिक मानसशास्त्राला. मनाचा अभ्यास करू पाहणार्‍या मानसशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं, की ज्याचा अभ्यास करायचा, ते मन, आपल्याला निरीक्षणासाठी उपलब्धच नाही मुळी. मग काय करायचं तर त्यांच्या लक्षात आलं, की मन हे माणसाच्या वर्तनाचं कारक आहे. म्हणजे मन सांगतं आणि माणूस त्याप्रमाणे वागतो. हा संबंध लक्षात आल्यानंतर मग मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र राहिलंच नाही. तर ते झालं मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आपलं वागणं आणि त्यामागची मूळ गुंतागुंत समजून घेण्यासाठी, आपल्याला मानसशास्त्राचीच मदत घेणे गरजेचे आहे. मानसशास्त्राला हे समजलं की *माणसाचं मन म्हणजे जन्मापासून त्याला आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातून त्याला झालेल्या ज्ञानाची आणि त्याच्या एकूण मानसिक सवयींची गोळाबेरीज. यातली गम्मत अशी की असं अनुभवातून मिळालेले ज्ञान, म्हणजे त्या अनुभवांचा त्याने लावलेला अन्वयार्थ. आणि हा अन्वयार्थ लावण्यासाठी साधन म्हणून काम करतं, ते अशाच प्रकारे त्यापूर्वी मिळालेले पूर्वसंचित ज्ञान. म्हणून तर एकाच घटनेत सहभागी असणाऱ्या दोन माणसांना तीच एकच घटना वेगवेगळ्या प्रकार हे समजते. त्या एकाच घटनेचा त्या दोघांनी लावलेला अन्वयार्थ वेगवेगळा असू शकतो.
अनेक कारणांनी माणसाच्या मनात आपल्या आसपासच्या जगाच्या होणाऱ्या आकलनात गोंधळ होऊ लागतो. तेव्हा मग त्या माणसाच्या आकलनातील गडबड त्याच्या वागण्यात प्रगट होऊ लागते. अशा विचालित वर्तनाला मानसशास्त्राच्या भाषेत म्हणतात वर्तनसमस्या. वर्तनसमस्यांना कारणीभूत असणाऱ्या मनोवस्थेला मानसशास्त्रात मनोविकार असं म्हटलं जातं. आधुनिक मानसशास्त्राने अशा अनेक साध्या, आणि गंभीर मनोविकारांचा अधिक अगदी सूक्ष्मतेने अभ्यास केला. आणि त्यांचे दोन प्रमुख गट पाडले. पहिला गट म्हणजे सायकोसिस. या गटातील वर्तन समस्या या प्रामुख्याने वैद्यकशास्त्राच्या कक्षेत येणाऱ्या असतात. यांच्या उपचारांसाठी औषधोपचारांची गरज असते. यामध्ये छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया), किंवा उन्माद, असे अतिगंभीर आजार येतात.
दुसरा गट आहे तुमच्या माझ्यासारख्या संपूर्ण शहाण्या आणि अजिबात आजारी नसणाऱ्या सामान्य माणसांना सतावणा-या छोट्या-मोठ्या मानसिक, भावनिक अडचणी किंवा समस्या. उदाहरणार्थ भीती, चिंता, नैराश्य. वैद्यकीयदृष्ट्या या लोकांना आजारी, म्हणजे मनोरुग्ण असं म्हणता येत नाही. या समस्या अगदी छोट्या छोट्या असतात. पण कधी कधी त्यांचा आपल्या जगण्यावर होणारा परिणाम हा अतिशय गंभीर असू शकतो. त्यामुळे आपल्या जगण्यामध्ये अतिशय गंभीर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशा अगदी नॉर्मल माणसांच्या छोटया आणि गंभीर वर्तनसमस्या सोडवण्यासाठी अतिशय प्रभावीपणे उपयोगी पडणारी उपचार पद्धती, म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन. गंभीर अशा मनोविकारांमध्ये उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया ही उपयोगी नसते. ज्या व्यक्तींशी संवाद साधणं शक्य आहे अशाच व्यक्तींना ही उपचार पद्धती उपयोगी पडते. गंभीर मनोविकारांमध्ये हा संवाद शक्य नसतो. आधुनिक जगण्यातील ताणतणाव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वर्तन समस्यांना सामोरे जाण्यासाठी फारच प्रभावीपणे या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. अशा अनेक मानसिक समस्या आणि त्या सोडवण्यातील मानसशास्त्रीय समुपदेशनाची भूमिका आणि उपयोग, हाच या लेखमालेचा विषय आहे. मानसशास्त्रीय समुपदेशन ही आधुनिक काळातील मानसिक आरोग्याची आणि समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे. समुपदेशन आपल्या आयुष्यात कोणकोणत्या क्षेत्रात कसे उपयोगी पडू शकते याची आपण या लेखमालेमध्ये चर्चा करू.

-- *विवेक दसरे.*
मानसतज्ञ.
*मार्ग काउन्सिलिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर,*
अहमदनगर.
9881659901
हा लेख फाॕरवर्ड करायचा झाल्यास माझ्या नावासह करायला हरकत नाही.

05/04/2020

कोरोनाशी मानसिक लढाई भाग 3

' नेहमी सकारात्मक स्वसंवादांची निवड करा ' या वाक्याने आपण मागील भागाचा शेवट केला. स्वसंवाद म्हणजे आपण स्वतःशी साधलेला संवाद. शब्दांच्या स्वरूपात आपल्या मनात निर्माण होणारे विचार म्हणजे आपले स्वसंवाद.( Affirmations). आपण स्वतःशी जे बोलत असतो त्या बोलण्याने म्हणजेच " स्वसंवादाने " आपला " मूड " तयार होत असतो. पण मग आपण आपल्याशीच चालू असणारा हा स्वसंवाद बदलु शकतो का? त्यांची निवड करता येते का? तर निश्चितच करता येते. आपला मूड सुधारण्यासाठी आपण आपल्याला हवे तसे स्वसंवाद तयार करून त्यांची स्थापना आपण आपल्या मनात करू शकतो याची खात्री बाळगा. हे करायचं कसं ?

त्यासाठी सर्वप्रथम आवश्यकता पडते ती तटस्थपणा आणि निश्चयाची. हे आपल्याला करायचं आहे हा एकदा निश्चय झाला की मग आपण आपल्याला हवं ते करूच शकतो. निश्चय झाल्यावर आपण आता हे शोधू की आपल्या मनात नकारात्मक विचारांची सुरुवात कशी होते. बंदुकीची गोळी झाडायची असेल तर तिचा खटका दाबावा लागतो. त्याला trigger असे म्हणतात. ट्रिगर काय करतो ? तर गोळी सुटण्याची प्रोसेस सुरू करतो. त्याच प्रकारे आपल्या मनातील नकारात्मक विचार ------- सध्याच्या परिस्थितीमध्ये खासकरून कोरोना बद्दलचे विचार---- कशामुळे ट्रिगर होतात ? तर त्याला कारण आहेत आपल्या आसपासची माध्यमे. टीव्ही, आणि फेसबुक, व्हाट्सॲप, म्हणजेच मोबाईल फोन. त्यामुळे टीव्ही आणि मोबाइलचा वापर करताना कोरोनाबद्दलच्या बातम्यांपासून दूर राहा. दिवसभरात एकदाच , आपल्याला स्वतःला आवश्यक तेवढीच माहिती घ्या. क्रिकेट मॅचच्या स्कोअर सारखा दिवसभर कोरोनाच्या नवीन पेशंटचा आणि मृतांच्या आकड्यांचा स्कोअर मांडत बसू नका. व्हॉटसॲपवरील स्वयंघोषित तज्ञांची आपल्याला आवश्यकता नाही. त्याऐवजी मनाला आनंद देणाऱ्या इतर गोष्टी करा.

एवढे करूनही आपल्या मनात वाईट विचार येऊ लागलेच तर काय ? तर मग हे विचार वाक्याच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करा. वाक्याच्या स्वरूपात मांडलेले विचार म्हणजे आपण आपल्याशीच साधत असलेला स्वसंवाद. काय काय म्हणत असतो आपण स्वतःला ? तर असे अनेक विचार असतात. पण खास कोरोनाच्या संदर्भात हे विचार काय असतात ?

आपण असे काही नको असणारे , नकारात्मक विचार , आणि त्यांच्या ऐवजी करण्याचे स्वसंवादात्मक चांगले विचार कसे आहेत ते पाहू. यामध्ये पहिला विचार हा नकारात्मक विचार आहे. आणि त्यानंतरचा दिलेला विचार हा सकारात्मक विचार आहे जो सतत उच्चारण्याने नकारात्मक विचारावर विजय मिळवता येईल.

१) नकारात्मक विचार - काय भयंकर परिस्थिती आहे ही.... आकडा वाढतच चाललाय. मी पण आजारी पडलो तर ..... काय होईल ? अरे देवा ....! अवघडच आहे ...काय करावं बरं..?
या अशा विचारांनी मनात भीती निर्माण व्हायला लागते. तोच विचार सतत मनात घोळत राहिला तर अस्वस्थता यायला लागते.
असा विचार आल्यास पुढील वाक्ये मनाशी सतत म्हणावीत ....
सकारात्मक स्वसंवाद ....परिस्थिती कठीण आहे खरी... आणि मी एकटा ती बदलू शकत नाही हे पण खरे... पण मी एकटा स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.... घरात राहून , इतरांशी बाहेरच्या लोकांशी , संपर्क टाळून, मी स्वतः 100% सुरक्षित राहू शकतो. हे नक्की.

2) नकारात्मक विचार - किती कंटाळवाणा काळ आहे हा ...! घरात , म्हणजे जणू तुरुंगातच आहे मी. कोणाला भेटले नाही, काम नाही, मित्र नाही, सहज चक्कर मारायला सुद्धा जाता येत नाही. अगदीच असह्य झालाय हा तुरुंगवास....

सकारात्मक संवाद - सर्व गोष्टींपेक्षा मी जिवंत असणं महत्त्वाचं आहे. कोरोनापासून माझा बचाव होण्यासाठी , मी घरात आहे , तरच मी सुरक्षित आहे. हे जरा कंटाळवाणं आहे खरं पण मी हे मनापासून स्वीकारलंय. आणि मन रमवण्याचे काही दुसरे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो.

3) नकारात्मक विचार - परिस्थिती फारच बिघडत चाललीये.... काय होईल काही कळत नाही... भयंकर भीती वाटतेय.....

सकारात्मक संवाद - ही परिस्थिती मी एकटा बदलू शकणार नसलो, तरी स्वतःला , आणि माझ्या कुटुंबाला या आजारापासून सुरक्षित राखणे हेच " माझं " या राष्ट्रीय आपत्तीच्या निवारणासाठी योगदान आहे. मी स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवीन हे नक्की. आणि असाच विचार सर्वजण करतील तर या आपत्तीचे नक्कीच निवारण होईल.

वर आपण प्रातिनिधिकपणे तीन नकारात्मक anxiety, निर्माण करणारे विचार पाहिले, त्याच्या बरोबरीने दिलेले सकारात्मक स्वसंवाद जर आपण सारखे मनामध्ये घोळवत राहिलो तर निर्माण झालेली anxiety आपोआप नष्ट होऊन , बघा मूड फ्रेश होतो की नाही तो. फक्त हे सारखं मनाशी घोळवत ठेवण्याची सवय महत्त्वाची ......
विचारांच्या शब्द- स्वरूपाचा असा सुंदर वापर करून, आपण आपल्या मनाला कायम सकारात्मकतेशी बांधून राहण्याची सवय लावू शकतो. कोरोनाचं हे संकट तर तात्पुरतंच आहे. ते जाईलच. पण जाताना आपल्याला सकारात्मकतेची गरज, आणि ती विचारात बाणवण्याचे कौशल्य शिकवून जाणार असं व्हायला हवं. मग आयुष्यात कितीही संकटे येवोत, आपण डगमगणार नाही हे खरं.....

--प्रा. विवेक दसरे.
मार्ग समुपदेशन प्रबोधिनी, अहमदनगर.
9881659901.
- माझ्या नावासह पुढे पाठवायला हरकत नाहीच.

Address

"Vineet", MangalHousing Society , Opp. Sanjay Super Market , Gulmohar Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 9am - 11am
5pm - 8pm
Tuesday 9am - 11am
Wednesday 9am - 11am
5pm - 8pm
Thursday 9am - 11am
Friday 9am - 11am
5pm - 8pm
Saturday 9am - 11am
Sunday 9am - 1pm

Telephone

+919881659901

Alerts

Be the first to know and let us send you an email when MARG Institute For SELF Development posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MARG Institute For SELF Development:

Share