29/09/2024
" नवउद्योजकांनी पाळावयाची दहा महत्त्वाची पथ्ये "
नमस्कार मित्रांनो ! उद्योजक बनायची पहिलीच वेळ (नि म्हणून पहिलाच अनुभव) असेल तर काही महत्त्वाची पथ्ये ही पाळायलाच हवीत. अशा दहा पथ्यांबद्दल इथे चर्चा करूयात. अर्थात ही यादी आणखी मोठी करता येऊ शकेल. सुयोग्य उद्योग निवडण्यासाठी एक वर्षभर विस्तृत माहिती घ्या. हे पहिले पथ्य अत्यंत महत्त्वाचे. भावनेच्या भरात जाऊन किंवा एखाद्याने सुचवले म्हणून लगेच कोणत्याही उद्योगात उतरायचे नसते. हा अभ्यास दोन अंगांनी करा. उद्योगातील धोका, स्पर्धा, भांडवलाची व कौशल्याची गरज, पुरवठादार, ग्राहकांचा प्रकार व सरकारी धोरणे यांचा समावेश पहिल्या अभ्यासात होतो. दुसऱ्या अभ्यासात आपले व्यक्तीमत्व (बलस्थाने व दुर्बलता), कौटुंबिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी, आपली आवड किंवा मानसिकता यांच्याशी पहिल्या अभ्यासातील घटकांची सांगड घाला. उद्योगासाठी 'लवचिक कार्यपद्धती'ची व 'व्यावहारिक चातुर्या'ची मानसिकता अत्यंत आवश्यक असते. आपल्याकडे असे चातुर्य नसेल तर असा चतुर व विश्वासू भागिदार हा घेता येतो. "Method of deletion"ने अडचणीचे वा न आवडणारे उद्योग वगळत जाऊन दोन - तीन पर्यायांवर पोहोचा. आता या पर्यायांबद्दलची चर्चा आपले कुटुंबीय, संभाव्य भागीदार, त्या त्या उद्योगातील अनुभवी उद्योजक व बँकरशी करा. अनुभवी बँकर तुम्हाला अनेक धोक्यांची व संधींची जाणीव करुन देऊ शकतो. शेवटी एक सुयोग्य उद्योग निवडा.
दुसरे पथ्य हे या उद्योजकीय वाटचालीतील दुसरे महत्त्वाचे पाऊल ठरते. निवडलेला पसंतीचा उद्योग करणारी एखादी चांगली कंपनी गाठा व तिथे दोन वर्षे डोळसपणे नोकरी करा. विक्री, उत्पादन, आर्थिक तपशील म्हणजे प्रॉडक्टचे कॉस्टिंग व प्राईसिंग, प्रतिस्पर्धी, तंत्रज्ञानातील गुंतवणूक, पुरवठादार इ. गोष्टी बारकाईने जाणून घ्या. "सहकाऱ्यांची टीम" कशी उभी करतात ते समजावून घ्या. कोणत्याही उद्योगात "टीम" ही अत्यंत महत्त्वाची असते. नोकरी संपवून त्या प्रॉडक्टचे "कमिशनवर आधारित विक्रेते" म्हणजे डिलर किंवा स्टॉकिस्ट व्हा. यामुळे भांडवली गुंतवणूक न करता हा उद्योग (विशेषतः बाजार व पुरवठादार) खोलात जाऊन समजून घेता येईल. सोबतीने उपयोगी पडणाऱ्या तमाम लोकांचे "नेटवर्क" बनवता येईल. नेटवर्कशिवाय कोणताही उद्योग करता येत नाही. आता तिसरे पथ्य पाळा. डायरेक्ट "मॅन्युफॅक्चरिंग"मध्ये न उतरता एखादे वर्ष फक्त "ट्रेडिंग" करा. यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपले "बिझनेस मॉडेल" काय असावे. बिझनेस मॉडेल म्हणजे 'उद्योग करण्याची पद्धत'. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतः वस्तूचे उत्पादन न करता छोट्या उत्पादकांकडून ते करवून घेऊ शकता. तुम्ही त्यांना कच्चा माल व मशिनरी पुरवा. यामुळे प्रॉडक्शन व कामगार व्यवस्थापनाचे टेंशन तुम्ही टाळू शकाल. तुम्हाला ब्रँडिंग व विक्रीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.
चौथे पथ्य हे भागिदार निवडण्याचे. हल्ली एकटा उद्योजक सर्व गोष्टी सांभाळू शकत नाही. भागिदार निवडताना त्याच्या स्वभावाला सर्वाधिक महत्त्व द्या. तुम्ही त्याला विशिष्ट कौशल्यासाठी निवडताय की त्याच्या भांडवलासाठी, हे नीटपणे ठरवा. नियंत्रण व भूमिका या दोन्ही बाबतीत लिखित करार करा. भावनेच्या भरात गोष्टी तोंडी ठेवू नका. त्याचे भांडवल स्विकारताना निरर्थक किंवा जाचक अटी मान्य करू नका. शक्य असल्यास तुमच्या कर्मचाऱ्यांपैकी उत्तम गुणवत्ता, स्वभाव व कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या एखाद्याला तुम्ही भागिदार बनवू शकता. हां, भागिदार बनताच त्याच्या अपेक्षा अव्वाच्यासव्वा वाढणार नाहीत, याची खातरजमा करा. पहिल्या पिढीतील भागिदार आपापसांत उत्तम वागतात. पुढच्या पिढीत परस्परसंबंधांबाबत प्रश्न उभे राहू शकतात. म्हणून अगदी सुरूवातीलाच भागिदार निवडताना त्याचे "सक्सेशन प्लॅन" तपासा. पाचवे पथ्य हे दूरगामी संकल्प (साधारणपणे तीन ते पाच वर्षांचे) बनविण्याबाबतचे असावे. यामुळे आपली उद्योजकीय वाटचाल ठरविता येईल जी कर्ज घेताना बँकरला दाखविता येईल. यामुळे बँकरचा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल व बँकिंगच्या व्यवहारात सवलती मिळतील. दूरगामी संकल्पामध्ये प्रत्येक ध्येयासाठी किंवा स्ट्रॅटेजीसाठी दोन टार्गेट ठरवा - थोडे महत्वाकांक्षी व मध्यम. महत्वाकांक्षी म्हणजे "Desirable" आणि मध्यम म्हणजे "Compulsory". प्रत्येक मुख्य स्ट्रॅटेजीसाठी एक पर्यायी स्ट्रॅटेजीही ठरवा. एखादी स्ट्रॅटेजी अपयशी ठरत असल्यास सहीसलामत बाहेर पडण्याची योजनाही आखून ठेवा.
सहावे पथ्य हे भांडवल उभारणीबाबतचे. सुरूवातीलाच मोठे कर्जाऊ भांडवल घेऊ नका. पन्नास वर्षांच्या "लीज"वर भाड्याने जमीन घेऊन कारखाना उभा करा. लीजमध्ये भविष्यात ती जमीन विशिष्ट किंमतीला विकत घेण्याच्या पर्यायाची तजवीज करून ठेवा. हां, जमीन खूप स्वस्तात मिळत असेल तर ती विकत घेण्याचा प्रयत्न करा. एकदम मोठी मॅनुफॅक्चरिंग कॅपॅसिटी उभी करू नका. काही महत्त्वाचे प्रॉडक्ट्स तुम्ही स्वतः बनवा, काही बाहेरून बनवून घ्या. यामुळे गुंतवणूक व कर्जाचा बोजा कमी ठेवता येईल. पहिली पाच वर्षे नफ्याचा अधिकांश भाग उद्योगात गुंतवा. यामुळे बॅलन्सशीटला बळकटी येईल. नंतरही "करपश्चात नफ्या"चा अर्धा हिस्सा उद्योगात गुंतवत रहा. पहिली पाच वर्षे स्वतःचा कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. सातवे पथ्य हे खूपच महत्त्वाचे. सुरूवातीपासूनच आर्थिक, व्यवस्थापकीय व तांत्रिक नियंत्रणाची अद्ययावत पद्धती वापरण्यास सुरुवात करा. यामुळे उद्योजकीय शिस्त ही राहिलच पण सोबतीला "धोक्याचे इशारे"ही (Early Warning Signals) मिळत जातील. अनिश्चितता व धोक्यांचे व्यवस्थापन अचूक असायला हवे. याच सिस्टीममधून बाजाराची माहिती मिळायला हवी. कामगार, पुरवठादार, बँकर व ग्राहक यांच्याबाबतचे निर्णय व त्यांची अंमलबजावणी वेळेत व्हायला हवी. या 'सिस्टीम'मुळे करभरणा, ऑडिट, सरकारला द्यावयाचे अहवाल इ.ची पूर्तता ही नीटपणे करता येईल. प्रत्येक उद्योजकीय व्यवहाराची नोंद ही सिस्टीममध्ये रोज व्हावी व संपूर्ण पारदर्शकता पाळली जावी, हे पथ्य महत्त्वाचे. यामुळे उद्योजकाचे मन व मेंदू हे थाऱ्यावर राहतात. सिस्टीम बलवान असेल तर कोणताही उद्योजकीय मालक हा आपल्या कर्मचाऱ्यांना कामाचे मोठे स्वातंत्र्य देऊ शकतो. थोडक्यात असे की "सिस्टिमिक शिस्त" ही पहिल्या दिवसापासून पाळायला हवी.
आठव्या पथ्यानुसार सचोटी न पाळणारे पुरवठादार, ग्राहक, बँकर्स, ऑडिटर्स, भागिदार, वित्त सल्लागार, विक्री एजंट्स टाळा. बऱ्याचदा शॉर्टकट्सने मिळणारे फायदे हे आकर्षक वाटतात जे नंतर अडचणी व संकटे निर्माण करतात. आपला "बिझनेस ब्रँड" हा सचोटीने मोठा होत जातो जो बहुसंख्य ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकर्सना व सरकारी अधिकाऱ्यांना आवडतो. "सरकारी व कायदेशीर पूर्तता करणारे अहवाल , ऑडिट, सिस्टीम मेंटेनन्स, अन्य कम्प्लाएंसेस" इ. गोष्टी उत्तम सेवापुरवठादारांकडून करवून घेतल्यास उद्योजकाची व त्याच्या टीमची ऊर्जा वाचेल. यामुळे उद्योगाकडे पूर्ण लक्ष देता येईल. नवव्या पथ्यानुसार तुमच्या "प्रॉडक्ट्स मिक्स"मध्ये तीन प्रकार बाळगा - ३०% मध्यम दर्जाचे, २०% उच्च दर्जाचे व ५०% सामान्य दर्जाचे. यामुळे सर्व प्रकारचे ग्राहक तुम्ही मिळवू शकाल, विक्री वाढेल, बाजारात तुम्ही सर्वत्र दिसू शकाल. विशिष्ट प्रकारच्या ग्राहकांवरच अवलंबून राहू नये, हा मोठा धडा कोरोनाच्या अवघड कालखंडाने आम्हाला शिकवलाय. शक्यतो सरकारी सवलतींवर आधारलेले प्रॉडक्ट्स टाळा, कारण सरकारी धोरणे ही बदलत असतात. सरकारी यंत्रणेवर गरजेपेक्षा अधिक अवलंबून रहायला नको. आपल्या प्रॉडक्ट्सचे ग्राहक भारताबाहेरही कसे निर्माण होतील, यावर भर दिला पाहिजे. स्थानिक व विदेशी बाजारांचे मिश्रण असण्याने विक्रीतील अनेक धोके टाळता येतात किंवा कमी करता येतात.
लेखाच्या शेवटी आपण दहावे पथ्य पाहूयात. तुमची 'उद्योजकीय वाटचाल' ही सुरूवातीला किमान वीस वर्षे उत्तम चालू ठेवण्यासाठी सत्कार - सोहळे, वेळेचा अपव्यय करणारे कार्यक्रम टाळा. ब्रँडिंगचा व नवे ग्राहक मिळवून देणारा प्रत्येक उपक्रम राबवा. यासाठी वेळ, ऊर्जा व साधने लागतात जी निरूत्पादक गोष्टींवर खर्चू नका. सुरूवातीला रोज किमान दहा तास काम करा, एक तास व्यायाम करा, कुटुंबासोबत व करमणूकीसाठी दोन तास घालवा, नव्या वाटचालीसाठी वाचन व लोकसंग्रह करण्याकरीता एक तास राखा, सामाजिक उपक्रम व संबंधांसाठी सरासरी एक तास, अनपेक्षितपणे येणाऱ्या घटनांसाठी एक तास आणि उत्तम निद्रेसाठी आठ तास रोज उपलब्ध असले पाहिजेत. तुमची टीम जसजशी मोठी व सक्षम होत जाईल, तसतसा फावला वेळ तुम्हाला अधिकचा मिळत जाईल. तुमच्या वरीष्ठ व उत्तम कर्मचाऱ्यांना "७० - ३०" या गुणोत्तरानुसार वेतन व कमिशन (किंवा बोनस) द्या, म्हणजे त्यांची कार्यक्षमता ही टिकून राहील. कामगारांच्या बाबतीत हेच गुणोत्तर "८५ - १५" असे ठेवा. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अंधश्रद्धा, अवडंबर, जातपात, अविश्वास, आळस व अहंकार या गोष्टींचा उद्योगात अजिबात शिरकाव होऊ देऊ नका. नम्रतेने, साधेपणाने व आपल्या लक्षावरच फक्त भर देत राहिलात तर शत्रूही कमी निर्माण होतील, स्पर्धक गाफील राहतील आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय आपली उद्योजकीय घोडदौड ही अव्याहतपणे चालू राहील ! नवउद्योजकांनो हा लेख आवडल्यास पुढील ईमेल पत्त्यावर जरूर कळवा -
[email protected]
----- डॉ. गिरीश जाखोटिया.
Copyright ©️ jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author's name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.
We use an integrated approach for business consultations, combining global realities and Indian priorities. We observe moral accountability and use original ideas, while offering solutions to our clients. Our training programmes are based on latest research, pragmatic and practical business inputs a...