15/05/2025
एक चांगली आयडिया आहे. तुम्ही तिच्यावर मेहनत घेतली, प्रोडक्ट तयार केलं. पण जाहिरात करायची तर तेवढं मोठं बजेट नाही. मग ग्राहकांपर्यंत पोहोचायचं तरी कसं? उत्तर आहे — कन्टेन्ट मार्केटिंग! हे केवळ मोठ्या ब्रँडसाठी नाही, तर प्रत्येक स्टार्टअपसाठी आवश्यक आहे. पण नेमकं हे असतं तरी काय? चला समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत.
प्रथम इंग्रजी व्याख्या जी सर्वसाधारणपणे प्रचलित आहे ती आधी बघुया.Content Marketing is a strategic marketing approach focused on creating and distributing valuable, relevant, and consistent content to attract and retain a clearly defined audience — and ultimately, to drive profitable customer action. ही व्याख्या नीट समजून घेतली, तर यात कंटेन्ट मार्केटिंगची सगळी मूळ तत्त्वं लपलेली आहेत. चला एक एक करुन बघू.
Strategic Marketing Approach
या व्याख्येच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करण्यात आलेले आहे की हा स्ट्रॅटेजिक अप्रोच आहे याचा अर्थ असा की रॅण्डमली पोस्ट करत न जाता अगोदर पूर्णपणे याची रणनीती आखली पाहिजे. कन्टेन्ट मार्केटिंगचे उद्दिष्ट काय आहे? ब्रॅंड अवेअऱनेस वाढवायचा आहे, विक्री करायची आहे की आपल्या एखाद्या सेवेसाठी लीड्स मिळवायचे आहेत? कोण ग्राहक असेल? तो कोणत्या माध्यमावर सक्रीय असेल, म्हणजेच तोे इन्स्टावर, एफबीवर की लिंक्डइनवर असतो, ते ठरवणेही महत्वाचे आहे. म्हणजे समजा एखाद्याला एखादा कोर्स विकायचा आहे जो काॅलेजमधील युवकांसाठी आहे तर इन्स्टाला प्राधान्य दिले पाहिजे. एखाद्या बी टू बी बिझनेससाठी लिंक्डइन हा चांगला पर्याय असू शकतो.
Valuable, Relevant and Consistent
ही तीन तत्वं Content Marketing चा गाभा आहेत, अस म्हटलं तर ते चुकीचे ठरु नये. आपण जो कन्टेन्ट प्रोड्यूस करणार त्यातून काहीतरी वॅल्यू देणे गरजेचे आहे. केवळ काहीतरी पोस्ट करायचे म्हणून करुन उपयोगी नाही. काहीतरी नवीन माहिती, प्रेरणा, मनोरंजन अस काहीतरी या कन्टेन्टमधून मिळायला पााहिजे. आपला कन्टेन्ट हा रेलेवंट असायला हवा. समजा युपीएससीच्या क्लाससाठी विद्यार्थी मिळावेत म्हणून कुणी युट्यूब चॅनल सुरु केले तर युपीएससीच्या अपडेट, काही कन्सेप्ट क्लिअर करणारे व्हीडीओ हा कन्टेन्ट असायला हवा. त्याऐवजी भलताच कन्टेन्ट असेल तर क्लासेस बंद करुन नवीन निश नाही का निवडावा लागणार? तिसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. समजा आज एक पोस्ट केली आणि नंतर दोन महिन्यांनी दुसरी केली तर याला काही कन्टेन्ट मार्केटिंग म्हणता येणार नाही. रोज, आठवड्यातून दोनदा, चारदा किंवा एकदा अस काहीतरी निश्चित केलेलं असणं महत्वाचं आहे. ब्रॅण्ड व्हाॅईसच्या अनुषंगाने देखिल कन्सिस्टन्सीचे महत्व आहे. ब्रॅण्ड व्हाॅईस, टोन यातही सातत्य राखलं पाहिजे.
Attract and Retain
कन्टेन्ट मार्केटिंगमधील ही एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्या संभाव्य ग्राहकाला आकर्षित करणे आणि त्याला सांभाळून ठेवणे. उदा. जर एखादा रिअल इस्टेट एजंट असेल आणि तो मुंबईत भाड्याने फ्लॅट किंवा पीजी मिळवून देत असेल तर संबंधित ग्राहक त्याच्याकडे कसे येणार? - इथे कीवर्ड रिसर्च करुन तयार केलेला कन्टेन्ट उपयोगी पडतो. समजा Best PG in Mumbai for working professionals किंवा Budget PG in Mumbai यासारख्या एखाद्या कीवर्डवर त्याचा कन्टेन्ट रॅंक झाला तर कल्पना करता येणार नाही इतका फायदा होऊ शकतो. पण कन्टेन्ट मार्केटिंगमध्ये असे डायरेक्ट सेल्ससाठी कन्टेन्ट अपलोड करण्याबरोबरच काहीतरी वॅल्यूही दिली पाहिजे, हे आपण वरील पाॅईंटमध्ये बघितलेच. म्हणजे 'मुंबईत पीजी शोधताना काय काळजी घ्याल' यासारखा कन्टेन्ट बनवला तर तो संभाव्य ग्राहकाला नक्की आकर्षित करेल.
आणि हो, नुसते आकर्षित करुन चालणार नाही. त्याला Retain ही करावा लागेल. नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा आपल्याकडे असलेला ग्राहक सांभाळण्यासाठी कमी खर्च करावा लागतो आणि हाच तर कन्टेन्ट मार्केटिंगचा महत्वाचा फायदा आहे. पण Retain करणं कस शक्य आहे तर त्याच उत्तर म्हणजे सातत्य. त्याविषयी वरच्या मुद्द्यात जाणून घेतले आहे.
थोडक्यात कन्टेन्ट मार्केटिंगमध्ये या सगळ्याचा उद्देश म्हणजे to drive profitable customer action. म्हणजे जर तुम्ही एखादे प्राॅडक्ट विकण्यासाठी हे सर्व सुरु केले असेल तर ते विकले जाणे आणि किंवा तुमच्या एखाद्या सेवेसाठी लीड्स मिळणे.
आता पुढचं पाऊल तुमचं आहे. तुम्ही स्टार्टअप असाल, इंडिपेंडंट प्रोफेशनल किंवा छोटा व्यवसाय — कंटेन्ट मार्केटिंग म्हणजे केवळ "पोस्ट टाकणं" नाही. ती एक दीर्घकालीन रणनीती आहे जी विश्वास निर्माण करते, ग्राहक जोडते आणि व्यवसाय वाढवते. तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जे कन्टेन्ट मार्केटिंग करताय त्याचा तुम्हाला अपेक्षित फायदा होतोय का, ते जरुर तपासा. आणि तुमचा कन्टेन्ट मार्केटिंग प्लॅन तयार करण्यासाठी किंवा सध्याच्या प्लॅनचा फ्री रिव्यू करण्यासाठी मला डीएम करा.
- किरण बेडेकर