01/02/2025
तू जरूर ये
पण आलाच तर नुसता कोरडा येऊ नको
गडगडाटासह ये, येताना विजांचा कडकडाट घेऊन ये
वादळवारं घेऊन ये, येताना सतरंगी इंद्रधनुष्य ही घेऊन ये
उन्हानं रापलेल्या भाजलेल्या मातीवर शिंपडण्यासाठी
थंडगार थेंबाची बरसात घेऊन ये
तुझ्या विरहीत तडपडून जिंच काळीज फाटून
त्याला भेगा पडल्यात त्या धरतीला
तुझ्या प्रेम वर्षावात चिंब भिजवून टाकायला ये
आलाच तर निसंकोच ये, लाजू नकोस अजिबात
अगदी आपल्याच घरी आल्याच्या अविर्भावात ये
एखाद्या अल्लड पोरीसारखा धावत धावत ये
पण येताना एकच गोष्ट लक्षात ठेव
गेल्या बऱ्याच वर्षात कागदी नावा दारातल्या पाण्यात तरंगल्या नाहीत
अशा पोरांच बालपण संपून जाण्याच्या आधी तू ये
म्हणजे मग तुला तुझ्या आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल
आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत उभे आहोत
सोबतीला काही चातक सुध्दा आहेत इथे
तुला मनसोक्त खेळता यावं म्हणून तुझ्या माझ्या बापानं
नांगराच्या फाळांनी खेळपट्टी तयार करून ठेवली आहे
तुझ्या स्वागतासाठी
तेव्हा तू येच
#तू ये
#दुष्काळ