23/05/2016
आजचा शेती सल्ला: खरीप ज्वारी लागवड तंत्रज्ञान
खरीप ज्वारीची योग्य वेळी पेरणी केली,
तर चांगले उत्पादन मिळते. यासाठी संकरित व सुधारित वाणांचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे आहे.
लागवडीसाठी चांगला निचरा असलेली व ५.५ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत हे पीक घेता येते. चिकण पोयट्याची, मध्यम काळी जमीन खरीप ज्वारी लागवडीस योग्य आहे. जमिनीची चांगली नांगरट करून दोन ते तीन वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी १० ते १२ गाड्या प्रति हेक्टरी शेणखत जमिनीत मिसळावे. नैर्ऋत्य मॉन्सूनचा चांगला पाऊस झाल्यावर वाफसा येताच पेरणी लवकर करावी. शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी उरकावी. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव कमी होतो.
वाणाची निवड
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीतर्फे शिफारशीत वाण:
सुधारित वाण
१) सी.एस.व्ही. १५: ११० ते ११२ दिवसांत पक्व होतो. कोरडवाहू शेतीमध्ये धान्याचे सरासरी ३.५ ते ३.७ टन/ हेक्टर उत्पादन, तर कडब्याचे ११.५ ते १२.५ टन/ हेक्टर उत्पादन. या वाणाचे धांडे गोड असून, पाने जास्त काळ हिरवी राहतात. पानांवरील रोगांना प्रतिकारक तसेच खोडमाशी आणि खोडकिडीस प्रतिकारक्षम.
२) सी.एस.व्ही. १७: हा वाण बुटका आहे आणि अति लवकर पक्व होतो. अवर्षणग्रस्त क्षेत्रांसाठी अत्यंत उपयोगी. धान्याचे उत्पादन सरासरी २.२ ते २.५ टन/ हे. आणि कडब्याचे उत्पादन ६.५ ते ७ टन/ हे., खोडमाशी व खोडकिड्यास काही प्रमाणात प्रतिकारक्षम.
३) सी.एस.व्ही. २०: 1०९ दिवसांत तयार होतो. धान्याचे ३ ते ३.५ टन प्रति हेक्टरी उत्पादन. कडब्याचे 1३ ते १४ टन प्रति हेक्टरी उत्पादन. या वाणाचे दाणे मोत्यांसारखे पांढरे आहेत. हा वाण न लोळणारा आहे, त्यामुळे धान्याचे जास्त नुकसान होत नाही.
४) सी.एस.व्ही. २३: ११०ते११५ दिवसांमध्ये पक्व होतो. धान्याचे प्रति हेक्टचरी २.५ ते ३ टन व कडब्याचे १५ ते १६ टन उत्पादन मिळते. खोडमाशी आणि खोडकिड्यास प्रतिकारक्षम.
५) एस.पी.व्ही. ६६९: ११५-१२० दिवसांत तयार होतो. धान्याचे हे. ३.८ ते ४ टन उत्पादन आणि कडब्याचे १२ ते १२.५ टन उत्पादन.
६) पी.व्ही.के. ८०१: ११५ ते १२० दिवसांत तयार होतो. पावसात सापडल्यास इतर वाणांच्या तुलनेत या वाणाचे दाणे कमी काळे पडतात. प्रतिकूल परिस्थितीत हा वाण जमिनीवर लोळत नाही. हेक्टरी चार टन धान्याचे उत्पादन.
७) पी.व्ही.के. ८०९: अधिक धान्य आणि कडबा उत्पादन असा दुहेरी उपयुक्त वाण. हा वाण ११५ ते १२० दिवसांत तयार होतो. प्रति हेक्टरी ४ ते ४.५ टन धान्याचे उत्पादन.
संकरित वाण
१) सी.एस.एच. १४ हा वाण १०५ दिवसांत तयार होतो. मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवडीसाठी शिफारस. दाणे मोत्यांसारखे पांढरे. दाण्यावरील बुरशीस प्रतिकारक्षम वाण. धान्याचे सरासरी उत्पादन ३.७ ते ४ टन/ हे. कडब्याचे ८.५ ते ९ टन उत्पादन.
२) सी.एस.एच. १६: ११० दिवसांमध्ये तयार होतो. धान्याचे उत्पादन ४ ते ४.५ टन/ हे. आणि कडब्याचे ९.५ ते १० टन/ हे., दाण्यांवरील बुरशी व पानांवरील रोगांस हा वाण प्रतिकारक्षम. कडब्याची उत्कृष्ट गुणवत्ता.
३) सी.एस.एच. २३: १०५ दिवसांत तयार होतो. दाण्यांवरील बुरशीस प्रतिकारक्षम. प्रति हेक्ट री धान्याचे ४ ते ४.२ टन आणि कडब्याचे ८.५ ते ९ टन उत्पादन.
रासायनिक खतांचा वापर
खरीप ज्वारीस माती परीक्षणानुसार १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. खरीप ज्वारीस दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्टर किंवा ऍझोस्पिरीलम हे जिवाणू खत चोळावे, त्यामुळे १५ ते २० टक्के उत्पादन वाढते. पेरणी तिफणीने/ दोन चाड्यांच्या पाभरीने करावी. दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपांतील १५ सें.मी. इतके ठेवावे. पेरणीस हेक्टरी दहा किलो बियाणे वापरावे. संकरित ज्वारीचे मोहोरबंद पिशवीतील प्रमाणित बियाणे वापरावे. पहिली विरळणी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी आणि दुसरी विरळणी पेरणीनंतर २०-२२ दिवसांनी करावी. विरळणीनंतर १.८० ते २ लाख झाडांची संख्या ठेवावी.
आंतरपीक
पट्टा पद्धतीने तूर हे आंतरपीक३:१किंवा २:१ या प्रमाणात घ्यावे (दोन ओळी ज्वारीच्या व एक ओळ तुरीची किंवा दोन पाभरी ज्वारीच्या व एक पाभर तुरीची पेरावी), तसेच तुरीऐवजी मूग, उडीद व चवळी यासारखी आंतरपिकेदेखील घेता येतात.
पाणी व्यवस्थापन
पिकाचा जोमदार वाढीचा काळ (२० त २५ दिवस), पीक पोटरीत येण्याचा काळ (५० ते ७५ दिवस), फुलोऱ्यात येण्याचा काळ (८० ते ९० दिवस) व दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस) या चार अवस्थांत जरुरीप्रमाणे शक्य झाल्यास पाणी द्यावे.
"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.