17/05/2024
पावसाळ्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यातच हे काम करावे लागेल तरच पुढच्या उन्हाळ्यापर्यंतचे पाण्याचे नियोजन होऊ शकेल...
जलपुनर्भरण करुन पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवल्याने आणि
मॅजिक पिट म्हणजे आधुनिक शोष खड्डा या पद्धतीने वाहुन जाणारे सांडपाणी जमिनीत मुरवल्याने
बोअरवेल आणि विहिरींचे पाणी वाढले आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे आणि तो जमिनीत मुरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी जनजागरणाची आवश्यकता आहे.
पाण्याचा अपव्यय टाळावा, जलसाक्षरता वाढवावी.
आपली पृथ्वी 'निळी' आहे. कारण पृथ्वी हि ७१ % पाणी २९ % जमिनीने वेढलेली आहे. ७१% पाण्यापैकी ९७.२५% हे समुद्राचे पाणी आहे. हे खारेपाणी माणसाला पिण्यायोग्य नसल्याने फक्त २.७५% एवढेच शुद्ध पाणी पिण्यायोग्य आहे.
म्हणून हा पाण्याचा ठेवा योग्य पद्धतीने वापरणे हि संपूर्ण मानव जातीची जबाबदारी आहे. परंतु 'तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची ' आपली सवय आपल्यासाठी घातक ठरत आहे. मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही योग्य ते उपाययोजना न केले गेल्याने आज मराठवाड्याला भीषण पाण्याच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.
गोडाला मुंग्या लागाव्यात त्याप्रमाणे 'पाण्याला माणसे लागत आहेत'
जिथे कुठे पाणी असेल तिथे तिथे लहानांपासून ते वयस्क ,अबाल वृद्ध हातात पाण्याच्या घागरी, कळश्या घेवून बारी धरून तासंतास रांगेत उभे आहेत.
आज पैसा असणार्यानाही पैसा पाण्यापुढे किती कवडी मोल आहे हे जाणवत असावे. कारण आज पैसा देवूनही विकत घेण्यासाठी पाणी उपलब्ध नाही ;एवढी भीषणता निर्माण झाली आहे. ' पाण्यासारखा पैसा ओतला ' हि म्हणही खुजी ठरत आहे. पाणी 'अनमोल ' आहे याची प्रचीती दुष्काळग्रस्तांना येत आहे. कारण जे आपल्याजवळ नसते त्याचीच आपल्याला अधिक किंमत असते. ते जवळ असताना त्याचे मोल समजत नाही. आज पाणी नसेल तर सर्व जीवनच ठप्प होते. आपण काहीच करू शकत नाही. म्हणून इतके दिवस 'पाणी हे जीवन आहे' हे फक्त म्हण म्हणत होतो परंतु आज त्याचा अर्थही चांगलाच समजत आहे.
अपार्टमेंट मध्ये तर विचारूच नका ;एवढी पाण्याची उधळपट्टी !! सर्वाना सार्वजनिक पाण्याचे मेंटेनन्स असते म्हणून वापरा कसेही पाणी. देतोना आपण पैसे ,हि विचारसरणी. ते नाही का वापरत पाणी मग मीच का काटकसर करू? अशी संकुचित बुद्धी प्रत्येकानेच ठेवली तर आजचे परिणाम साहजिकच आहेत. आजही ट्यनकरने पाणी विकत घेवूनही पाणी काटकसरीने अपार्टमेंट मध्ये वापरले जात नाही. भांडीवाली, धुनवाली नळ सोडूनच आपले काम करतात. परंतु मालकीण बाईना साधे नळ न वापरता बकेट, टब याचाच वापर करायला सांगण्याचेही सुचत नाहीत. वरून कामवाली बाईहि सगळेच असेच पाणी वापरतात असे बोलून मोकळे. नळाचा वापर टाळाच. कारण यामुळे बरेच पाणी अधिक वाया जाते.
पाणी असताना त्याचा अपव्यय टाळणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. परंतु आजपर्यंत आमच्याकडे पाणी आले कि ते गटारीतून वाहतानाचे दृश्य हे सर्वसामाण्यानच्या परिचयाचे आहे. पाणी आले कि गाड्या धूणे, फरश्यांवर पाणी सांडणे, ताजे पाणी भरायचे म्हणून जुने पाणी असेच भडभडा ओतून द्यायचे.
अहो ! पाणी कधी शिळे होत नसते. धरणातील पाणीच आपल्याला नळातून येत असते. साधे पाण्याला तोट्यासुद्धा यांना बसवता येवू नयेत. पाणी भरने झाले कि तोट्यातून पाणी गटारीत खुशाल वाहत जाणार .याचे दु:ख कोणालाच होत नसे. आता पाण्याचा थेंबही वाचवण्याची वेळ आली आहे. जर हि काटकसर आधीच केली असती तर आज हि वेळ आली नसती.
गटारीतून वाहून जाणारे सांडपाणी हे जमिनीत मुरवून भूजलपातळी वाढवली पाहिजे ; तसेच जलपुनर्भरण करून वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून बोरचे पाणी वाढवले जावू शकते. म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब मुरवला गेला पाहिजे तरच पाण्याच्या दुष्काळावर मात करता येईल. पाण्याचा वापर काटकसरीने केला गेला पाहिजे.
कारण ' पाणी हे जीवन 'आहे ते नसेल तर जीवन थांबून जाईल.
'जल है तो कल है |'
हे ओळखून पाण्याचे महत्व जाणून घेतले पाहिजे.
प्रत्येकाने जलसाक्षर झाले पाहिजे.
पाणी वाचवा जीवन वाचवा !!
जलसाक्षर व्हा ! जलसाक्षर करा !!
पाणी अडवा ! पाणी जीरवा !!
पाणी अडवा !
पाणी जीरवा!!