02/09/2026
“चकणा की खंबा?” — आयुष्याची सामाजिक किंमत सांगणारे जयवंत आवटे यांचे भन्नाट उदाहरण!
श्री. जयवंत आवटे हे आपल्या सांगली जिल्ह्यातील कुंडलचे वक्ते. ग्रामीण भाषेतील मिश्कील शैलीतून अत्यंत प्रभावी समाजप्रबोधनपर व्याख्याने देणे ही त्यांची खासियत आहे. त्यांची व्याख्याने YouTube वर जरूर ऐका.
त्यांच्या एका व्याख्यानात त्यांनी “जीवनमूल्य आणि सामाजिक किंमत” यावर एक भन्नाट उदाहरण दिले.
ते म्हणतात—
“समजा तुम्ही फक्त चकणा घेऊन बसला, तर कोणी खंबा घेऊन तुमच्याकडे येईल का?”
नाही!
पण तुम्ही खंबा घेऊन बसलात, तर चकणा घेऊन दहा जण तुमच्याभोवती येतील!
ऐकायला हे विनोदी आहे; पण त्यामागचा जीवनाचा धडा मात्र खूप गंभीर आहे.
आपल्या समाजात अनेक लोक आपले सामाजिक महत्त्व वाढावे, लोकांनी आपल्याला ओळखावे, आपल्याभोवती गर्दी असावी म्हणून सतत काही ना काही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात.
स्थळं पाहणे, कांदे-पोहे, लग्नसमारंभ, बोकड जेवण , गृहप्रवेश, यात्रा-जत्रा, माती, दहावा, मंडळाची कामे, पुढाऱ्यांच्या मागे फिरणे… निवडक प्रसंगी निश्चितच आपापले धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे.
पण अनेकदा त्यामागे “आपले सामाजिक महत्त्व वाढावे” किंवा “आपण समाजात दिसत राहावे” ही मानसिकताही असते.
यालाच विनोदाच्या भाषेत “चकणा” म्हणता येईल.
आता “खंबा” म्हणजे काय?
खंबा म्हणजे—
👉 स्पर्धा परीक्षा देऊन चांगले पद मिळवणे
👉 चांगला व्यवसाय उभा करणे
👉 स्वतःचे घर-बंगला-फ्लॅट घेणे
👉 चांगली कार घेणे
👉 शेती आधुनिक करून बागायती करणे
👉 डॉक्टर, CA, IT इंजिनिअर यांसारखे चांगले शिक्षण घेणे
👉 कला, क्रीडा क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण करणे
👉 स्वतःच्या कर्तृत्वातून आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन मिळवणे.
थोडक्यात, स्वतःच्या आयुष्यात काहीतरी भक्कम निर्माण करणे म्हणजे “खंबा”!
आणि हा खंबा तुमच्याकडे असेल, तर चकणा घेऊन येणारे दहा जण आपोआप तुमच्याभोवती जमा होतात!
म्हणजेच—
लोक आपल्या भोवती किती आहेत, यापेक्षा आपण स्वतःच्या आयुष्यात किती मूल्य निर्माण केले आहे, हे महत्त्वाचे.
आपण दुसऱ्यांच्या कार्यक्रमात सतत दिसतो म्हणून आपली किंमत वाढत नाही.
आपली किंमत वाढते ती आपल्या कर्तृत्वाने, ज्ञानाने, संपत्तीने, कौशल्याने आणि केलेल्या चांगल्या कामाने.
म्हणून आयुष्यात फक्त “चकणा” जमा करण्यापेक्षा आपला “खंबा” मजबूत करण्याचा प्रयत्न करा.
कारण— खंबा मजबूत असेल तर गर्दी आपोआप येते!
याच विनोदी उदाहरणातून श्री. जयवंत आवटे यांनी आपल्याला एक सुंदर जीवनमूल्य सांगितले आहे:
“आयुष्यातील खरे मूल्य ओळखा…
ते निर्माण करा…
आणि ते कमवा!”
(टीप : “चकणा” आणि “खंबा” हे उदाहरण केवळ विनोद आणि जीवनमूल्य समजावून सांगण्यासाठी वापरले आहे. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे.)
आपला,
प्रकाश भोसले | Business Cunsultant |