23/07/2021
" वर्षावास प्रारंभ व आषाढ पौर्णिमेचे महत्व" -- सुरेंद्र घरडे
तथागत बुध्दांच्या जीवनात प्रत्येक पावन पौर्णिमेला काही-ना काही महत्वपुर्ण घटना घडली. १२ ही पौर्णिमेचे महत्व अतिशय महत्वपुर्ण आहेत. म्हणुनच जगातील प्रत्येक बौध्द व्यक्ती/ उपासक या पौर्णिमेचे महत्व समज़ुन त्या दिवशी उपोसथ व पंचशील ग्रहन करतो.
आज आषाढ पौर्णिमा :- तथागतांच्या जीवनातील अतिशय महत्वपुर्ण पौर्णिमा ही आहे. आजच्याच दिवशी शाक्यमुनी तथागत बुध्दांच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस अशा काही पाच महत्त्वाच्या घटना घडल्या की, ज्यांच्या चर्चेशिवाय बुध्द चरित्राला परिपूर्णता येणे शक्य नाही.
१ ) राणी महामायेचे स्वप्न - आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अद्भुत होते. या स्वप्नात राणीने पाहिले की, चारही दिशेने दूत येतात, राणीचा शाही पलंग राणीसह उचलून हिमालय पर्वताच्या हिमवन्त प्रदेशातील एका शालवनाजवळील ‘अनोतवदह’ नावाच्या सरोवरावर नेतात. सुंदर, सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवतात. थोड्या वेळानंतर त्या चारही दूतांच्या पत्नी तेथे येतात. त्यांनी राणीस हळूच झोपेतून उठवून सुगंधी लेपने सर्वांगास सजवून राणीस स्नान घालतात. स्नानानंतर सुंदर सुसज्जीत वस्त्र देतात. त्यानंतर राणीस सुगंधी फुलांनी, सुवासिक अत्तरांनी असे काही सजवतात की, राणी एका सुंदर वनकन्येसारखी दिसू लागते. काही वेळाने सहा दंताचा शुभ्र गजराज तेथे येतो. त्याने आपल्या सोंडेत श्वेत कमलपुष्पांची माळ धारण केलेली असते. राणीच्या शय्येभोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो. नेमके याचं वेळी राणी स्वप्नातून जागी होते. दुस-या दिवशी सकाळी महामायेने हे स्वप्न शुध्दोधन राज्यास सांगितले. तेव्हा तेव्हा त्यांनी स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शम्म, ध्वज, लक्खण, मंत्री, कोण्डज, भोज, सुयाम, आणि सुदत्त या आठ स्वप्न शास्त्रांना दरबारात बोलावून घेतले. व राणीच्या स्वप्नाचा अर्थ त्यांना विचारण्यात आला. सर्वात वृद्ध शास्त्री होता त्याने राजास या स्वप्नाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला “राजन आपण स्वप्ना संबंधी कसलही चिंता करु नये. निश्चत असावे. हे स्वप्न फारच सुखद असून याचा परिणाम अतिशय शुभ व मंगलमय आहे. आपल्या घरी लवकरच राजपुत्र जन्मास येणार आहे. या स्वप्नांच्या व्दारे राणी महामायेस या आषाढ पौर्णिमेच्या शुभ घडीस गर्भधारणा झालेली आहे.” म्हणूनच या आषाढ पौर्णिमेस ‘गर्भमंगल दिन’ म्हणतात. संपुर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
२ ) सिध्दार्थ गौतमाचा गृहत्याग - कपिलवस्तूच्या शेजारी रामग्रामचे कोलीय यांचे राज्य होते. या दोन राज्यांमधून रोहिणी नावाची नदी वाहत असे. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेती करीता वापरीत. नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे? व किती घ्यावे? याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात यांचा वाद होत असे. हा वाद कायमचा मिटवावयाचा असेल तर तो युद्धानेच मिटवावा असा निर्णय शाक्य संघाने आमसभेत घेतला. याच सभेत सिध्दार्थ गौतमाने असे घोषित केले की, “संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे.” “युद्धाने हा प्रश्न न सोडवता दोन्ही बाजूकडील दोन- दोन प्रतिनिधी निवडून द्यावेत. आणि त्यांनी एक पाचवा प्रतिनिधी निवडावा व पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा.” असे स्पष्ट मत सिद्धार्थाने मांडले. गौतमाचे हे मत म्हणजे शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान होते. जो कुणी संघाच्या निर्णया विरुध्द वागतो किंवा संघाचा आदेश मोडतो, त्यास संघ शिक्षा केल्या शिवाय सोडत नसे. म्हणूनच सिध्दार्थ गौतमाने स्वखुशीने देश त्याग पर्याय स्विकारण्यास तैयार झाले. सत्य व न्याय यापासून परावृत्त होणे यापेक्षा देशत्याग करण्याचा निर्णय केव्हाही चांगला. म्हणूनच सिध्दार्थ गौतमाने दृ:ख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी वयाच्या २९ व्या वर्षी घराबाहेर पडुन अन्नत्याग करुन अतिशय खडतर तपश्र्यर्यसारखा मार्ग स्वीकारला तो दिवस आषाढ पौर्णिमा होता.
३ ) पंचमवर्गीय भिक्खूंची दीक्षा-
भगवंतास संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मज्ञान कोणास सांगावे किंवा सांगू नये ? असा प्रश्न तथागतास पडला. संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुस-यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की, आत्मकल्याणा पुरताच तो सीमित ठेवावा असा विचार ते करु लागले. यास बुध्दांचा ‘विषादयोग’ असे म्हणतात. शेवटी तथागताने विचार केला. सर्व जगास शांती प्राप्त व्हावी, दुःखातून सर्वांची मुक्त्ता व्हावी हे तर आवश्यक आहे. तेव्हा या महान धम्माचा उपदेश इतरांच्या कल्याना करिता सांगण्याचा निश्चय तथागतांनी केला. सर्वप्रथम हा धम्म कोणास द्यावा असा विचार केला असतां त्यांना सर्वप्रथम आलारकालाम यांची आठवण झाली. तथागतांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व शुध्दचरणी होता. परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले. त्यानंतर उद्दक रामपुत्ताला धम्मोपदेश देण्याचा विचार त्यांनी केला. परंतु तोही आठ दिवसांपूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तथागतांना पंचवर्गीय भिक्खूं कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन प्रव्रज्जीत केले. यास ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ या नावाने संबोधतात. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता.
४ ) भिक्खुं संघाची स्थापना:- बौध्द- धम्माचा प्रचार - प्रसार करण्याच्या उद्देशाने व हा मानव कल्यानाचा धम्म लोकांना कळावा या उद्गेशाने या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भिक्खुं संघाची स्थापना केली म्हणून या दिवसाला अतिशय महत्त्वाचे मानतात.
५ ) वर्षावास - पावसाळयात नदी नाल्यास पुर असतो. जंगलातून चालतांना हिंसक पशुंचा सामना करावा लागतो. पावसामुळे सर्वत्र हिरवळ असल्यामुळे चालतांना बारीक जंतु मरु शकतात. म्हणूनच पावसाळयात भिक्खुंनी एका ठिकाणी राहुन सामान्य जनतेला धम्म समजावून सांगावा. यालाच वर्षावास असे म्हणतात. भिक्खूनी बौद्ध धम्माची शिकवण देतां देतां चारिका करुन चरितार्थ चालवावा असा दंडक होता. दोन भिक्खूंनी एकत्र न फिरता वेग- वेगळ्या दिशेने धम्माचा प्रचार- प्रसार करावा. विहारात मुक्काम करुन धम्माचे तत्वज्ञान लोकानां समजावून सांगावे. याचं पावसाळ्यातील मुक्कामास ‘वर्षावास’ असे म्हणतात. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते. आषाढ पौर्णिमा ही अतिशय महत्वपुर्ण आहे. त्याचे स्मरण करावे. उपोसथ करुन या काळात धम्म ग्रहण करावे. पंचशील , अष्टशील, दहा पारमीता चे पालन करुन मुक्त हस्ते दान द्यावे व स्वःताचे व इतरांचे कल्यान करावे.
FB Page- https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.