29/12/2024
सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला असून, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणसाठी या चित्रपटाची घोषणा अंतिम सोहळ्यातच करण्यात आली होती.
‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह मराठी मालिकाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपाली पानसरे, ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ फेम इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ फेम पायल जाधव, तसेच ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत यांचा समावेश आहे.
अभिनेत्री दीपाली पानसरेने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर करत केदार शिंदेबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “जे ठरवलं होतं ते सत्यात उतरलं. केदार शिंदेबरोबर काम करण्याची माझी इच्छा अखेर पूर्ण झाली.”
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे व बेला शिंदे निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नेटिझन्सने दीपालीच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘झापुक झुपूक’ हा चित्रपट सूरज चव्हाणसाठी एक मोठी संधी आहे, तर मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.