धार्मिक विधी ,कुंडली ज्योतीष आणि वास्तुशास्र मार्गदर्शन

  • Home
  • India
  • Pune
  • धार्मिक विधी ,कुंडली ज्योतीष आणि वास्तुशास्र मार्गदर्शन

धार्मिक विधी ,कुंडली  ज्योतीष आणि वास्तुशास्र  मार्गदर्शन सर्व प्रकारचे धार्मिक विधी ज्योतीष श?

20/07/2020

*श्री मंगळागौरी पुजन माहिती*
(श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी हे पुजन करतात)

या वर्षी मंगळवार पासुनच श्रावणमास आरंभ होत असुन या वारी

*मंगळागौरी*.....
म्हणजे लग्नं झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य व अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करायची पुजा असते....

गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच. श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा मंगळवारी सुरू झालेली आहे. एकेकाळी भारतीय स्त्रियांचे जीवन असंख्य रूढी-परंपरांनी बंदिस्त होते. त्यामुळे मंगळागौरीसारखी व्रतवैकल्ये म्हणजे त्यांच्या उत्साहाला उधाण यायचे. लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौर दणक्‍यात साजरी केली जाते. मांगल्य, पावित्र्य आणि सुचिता यांचा त्रिवेणी संगम मंगळागौरीत आढळतो. पार्वतीसारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे, पतीवरती मृत्यूची भयाण सावली पडू नये म्हणून हे व्रत साजरे करण्याची प्रथा निर्माण झाली. निसर्गातील वृक्षवेली यांचा परिचय व्हावा, त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव जीवनात यावे यासाठी मंगळागौरीसारख्या व्रतांचे नियोजन झाले असावे.

श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रीयांचा सण. सौभाग्यवती स्त्रीयांना आपल्या भावना, संवेदना, आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर.

मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे. ह्या पूजेसाठी लग्न होऊन पाचपेक्षा अधिक वर्षे झाली नाहीत अशाच सौभाग्यवतीना बोलावण्यात येते. यांना वपोरी-वसोळी म्हणतात. मंगळागौरीच्या व्रतात शंकर, गणपती व गौरीची पूजा करतात.

*मंगळागौरीची पूजा* म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.

नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन, सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात.

या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवडयाचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इ.साहित्याची गरज असते.

ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्रीसाठी पोळया, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.

पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पुजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून, खेळ खेळून जागरणं करायचे असायचे. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची

“आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल”.

*मंगळागौर पुजन*

सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते.

*पत्री पूजा*

वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात.. पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री वहाव्यात असा समज आहे. पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकते

मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ
वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.

या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात.

*मंगळागौर कहानी*

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल”. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, “आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल”. असं बोलून बोवा चालता झाला.
तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरदार आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटी पुत्र नाही, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे”. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबी एकच फळ आहे”. फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासा वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी ‘लग्न करा’ म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, “माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे”. हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला.
इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू, म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे”. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.
दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठुन स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाही. मी त्याचे बरोबर खेळत नाही”. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापाला पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेकडो लोक येऊन जेवू लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू लागला, “मला असं असं स्वप्न पडलं”. मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा”. ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही”. दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा”. सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

आरती

जय देवी मंगळागौरी
जय देवी मंगळागौरी
सुवासीन मी तुला पुजिते

कुंकुम-तिलक माझ्या ललाटी
मंगल-मणी हे शोभत कंठी
रत्‍न-पाचूचा चुडा मनगटी
स्‍त्रीजन्माचे अहेव लेणे
तुझ्या कृपेने मला लाभते

शीवशंकराहुनी प्रेमळ भोळा
दिधलासी पती तू भाग्यवतीला
देहाच्या देव्हारी पूजीन त्याला
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती
अमृत तेजाळ....
पं. रविराज गुरुजी
9850053996

*⚜दीप पूजा⚜*           *(दीप अमावस्या)* *आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या...!*घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन...
19/07/2020

*⚜दीप पूजा⚜*
*(दीप अमावस्या)*

*आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या...!*

घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत...!

पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी...!
आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते.

आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी...!

गोडाचा नेवैद्य अर्पण करावा ..!

*आपल्या घरातील छोटा / छोटीला औक्षण करावे...! वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे...!*

दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी ....!!

या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात...!

त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते....!

पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात...!

•• ती प्रार्थना अशी ••

*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*

•• त्याचा अर्थ असा ••

*‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस...!*
*तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस..!*
*माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’..!!*

त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते...!
आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते...!
असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

*या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे...!*

तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती..!

लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या...!

पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली..!
गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला...!

भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली..!
नंतर सगुणेचा विचार करू लागली.

गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले...!

तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले..!

गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही..!

लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली...!

एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्‌ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली...!

अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली...!

नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली..!
राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले..!
सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ ..!

राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले...!
तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते...!

आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही..!
अशी शपथ घाल...!

त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली..!
या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य
खूप झाले...!

राज्यातले लोक
सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले...!!

अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे....!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*श्री.रविराजगुरुजी*
+91-9850053996

 #श्री_नृसिंह_भगवान_जंयती_माहिती वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशीला श्री नृसिंह जंयती आहे या बद्दल आपण माहिती घेऊश्री भगवान विष...
06/05/2020

#श्री_नृसिंह_भगवान_जंयती_माहिती

वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशीला श्री नृसिंह जंयती आहे या बद्दल आपण माहिती घेऊ

श्री भगवान विष्णूला 'दशावतारी' नावाने ओळखले जाते. कारण यांनी दहा अवतार घेतले होते असे ग्रंथामध्ये वर्णीत आहे. पौराणिक कथेनुसार सतयुगापासून ते द्वापार युगापर्यंत भगवान विष्णूंनी आतापर्यंत 9 अवतार घेतले असून यांचा दहावा अवतार कलियुगात होईल. जो कल्की नावाने ओळखला जाईल

आज आपण सृष्टीचे पालनहार श्रीहरीने प्रत्येक वेळी एका खास उद्येशाने अवतार धारण केला आहे. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा-जेव्हा पापांचा घडा भरला तेव्हा-तेव्हा तो फोडण्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला आहे. आज आपण त्यांच्या ज्या अवताराविषयी जाणून घेत आहोत, तो नृसिंह अवतार आहे

श्रीनृसिंह अवतार

जगाला संकटापासून वाचविण्यासाठी, भक्तांचे उद्धारासाठी भगवंतानी अनेक अवतार घेतलेले आहेत. नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकशिपूच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. याबाबत पुराणात पुढील गोष्ट आहे.

पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात कश्यप नावाचा एक राजा होता. त्यांच्या पत्नीचे नाव दिति होते. यांना दोन पुत्रांची प्राप्ती झाली. या दोघांची नावे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू ठेवण्यात आली.
हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू हे दोघे (दानव) भाऊ होते, त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार (दशावतारांपैकी तिसरा अवतार) घेऊन वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकशिपू अत्यंत संतापला. रागामुळे त्याचे डोळे लाल झाले, त्याच्या शरीराला कंप सुटला, तो आपले ओठ चावू लागला. त्याने सर्व सभेसमोर आपले शूळ वर उचलले व सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो जो दान, तप, यज्ञ यांद्वारे विष्णूची आराधना करेल त्याचा नाश करा. यज्ञ व अनुष्टान यामुळे देवांना शक्ती प्राप्त होते म्हणून जेथे ब्राह्मण किंवा ऋषी अशी कर्मे करीत असतील तेथे जाऊन तुम्ही ती कामे नष्ट करा. त्याने शपथ घेतली की, मीसुद्धा जेव्हा आपल्या शुळाने त्या विष्णूचा कंठ फोडून त्याच्या रक्ताने माझ्या प्रिय बंधूचे तर्पण करीन, तेव्हाच माझ्या मनाला शांती लाभेल. त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. यज्ञयाग बंद झाले. त्याच्या धास्तीने भयभीत झाले. यज्ञे बंद पडल्यामुळे देवांनाही हविर्भाग मिळेनासा झाला. त्यामुळे स्वर्गत्याग करून देव पृथ्वीवर गुप्त रितीने संचार करू लागले.

इकडे हिरण्यकशिपूने प्रतिप्रभू होण्याचा निश्चय केला. अमरत्व मिळविण्यासाठी मंदार पर्वतावर त्याने खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. एका निर्जन दरीमध्ये एकाच पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून व दृष्टी आकाशाकडे लावून त्याची तपश्चर्या सुरू झाली. त्याला मिळणार्‍या तपोबलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला. नद्या आटल्या, भूमीला थरकाप सुटला, नक्षत्रे गळाली व त्यामुळे सर्व देव संकटात सापडले. सर्व देवांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली व त्यांची विनवणी करू लागले. तेव्हा ब्रह्मदेव हिरण्याकशिपूकडे गेले, हिरण्याकशिपूचे शरीर वारुळे, गवत, वेळूंची बेटे, यांनी आच्छादून गेले होते, त्यातील रक्त, मांस किड्यामुग्यानी खाऊन टाकले होते. त्या स्थितीत त्याला पाहून देव विस्मित झाले व म्हणाले, "हे हिरण्यकशिपू, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे, तुझा देह किड्यामुंग्यानी भक्षण केला आहे, आणि तुझे प्राण अस्थीचाच आश्रय घेऊन राहिले आहेत. मी तुला वर देण्यासाठीच येथे आलो आहे." ब्रह्मदेवांनी त्यांच्या कमंडलूतले पाणी त्याच्या अंगावर टाकले. त्या जलामुळे हिरण्याकशिपूचे शरीर पूर्ववत झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, व म्हणाला, ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले.

हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे."

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबर्‍यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.

या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकशिपूने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला, राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भुते-प्रेते, या सर्वाना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले. स्वर्गावरही त्याने स्वतःचे अधिपत्य स्थापन केले; अप्सरांना त्याची स्तुती करण्यास त्याने भाग पाडले. त्याच्या या हाहाकारामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेस उत्तर म्हणून विष्णू म्हणाले की, मीच त्याचा वध करणार आहे. ज्या वेळेस हिरण्यकशिपू त्याच्या प्रल्हाद नामक पुत्राचा छळ करेल त्या वेळेस त्याचा विनाश नक्की होईल.

नियतीने ठरविल्याप्रमाणे हिरण्यकशिपूला प्रल्हाद (हिरण्यकशिपू व कयादू यांचा पुत्र) नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शीलसंपन्न असा सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रल्हाद परम विष्णुभक्त होता. आपल्या वडिलांनी विष्णूंशी केलेले शत्रुत्व प्रल्हादाला मान्य नव्हते. आपल्या मुलाला अजून ज्ञान नाही त्यामुळे तो असे आचरण करत आहे असे मानून हिरण्यकशिपूने त्याला विद्यार्जनासाठी गुरूकडे पाठविले. पण ज्ञानदानात शिकविले गेलेले भेदभाव प्रल्हादास मान्य नव्हते. एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता, त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल. पण प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे ताता मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. विष्णूचे कीर्तन, भजन, पूजन, या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणार्‍या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या. आज्ञेचे पालन करीत सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले. पण विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या कुशीत झेलले. कडेलोट करून देखील प्रल्हाद अजून जिवंत आहे, आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्यकशिपूच्या रागाचा उद्रेक झाला. क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. स्वतःच्या भावाला हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने (हिरण्यकशिपूची बहिण ) एक युक्ती शोधली, होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. पण या वराचा तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल. सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला, तर त्याला दिसले की आपली प्रिय बहीण होलिका आगीत भस्म होऊन गेली आहे, आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. (होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला, अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय आपण होळी म्हणून साजरा करतो ). हिरण्यकशिपूच्या डोळ्यातील क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की, प्रल्हादाला अन्नपाण्याशिवाय कारागृहात डांबण्यात यावे. सेवकांनी या आज्ञेचेही तंतोतंत पालन केले, पण यामुळेसुद्धा प्रल्हादाची भगवान नारायणावरील भक्ती थोडीसुद्धा कमी झाली नाही. सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकशिपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवितो. माझ्याहून वेगळा असा जगाचा नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे ? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता , हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होवून हिरण्यकशिपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटले की काय असा सर्वाना भास झाला. तो नाद कोठून आला हे हिरण्यकशिपूलासुद्धा समजले नाही. इतक्यात सर्व भूतमात्रामध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरिता व आपल्या भक्ताने केलेले वचन खरे करण्यासाठी, ब्रह्मदेवांच्या वराचा मान राखत मनुष्याकार नव्हे व मृगाकार नव्हे, असे अत्यंत अद्‌भुत रूप धारण करणारे श्री हरी खांबातून प्रकट झाले. खांबातून बाहेर पडणारे मनुष्य व सिंह असे मिश्र रूप हिराण्यकशिपूने पहिले, (त्याला मिळालेल्या वरानुसार ते रूप मनुष्यही नव्हते आणि प्राणीही नव्हते) हा मृगही नाही आणि नरही नव्हे तर हा कोणता विचित्र प्राणी आहे ? असा विचार करत असताना भगवान त्याच्या समोर येऊन उभे राहिले. श्री हरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते,त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिहाचे होते,त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते, त्यांच्या मानेवरील केस विजेप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या, जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल व तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुवयांमुळे त्यांचे मुख उग्र दिसत होते, कान शंकूप्रमाणे ताठ उभारलेले होते, त्यांचे तोंड व नाकपुड्या पर्वताच्या गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्यांचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश होते. चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण केस त्यांच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्यांची आयुधे होती. त्यांच्याजवळ जाणे अशक्यच होते, तरीसुद्धा हिरण्यकश्यपूने त्या नरसिहाकडे धाव घेतली; परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो तसा तो दैत्य निस्तेज झाला. नरसिहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबर्‍यावर बसून त्याला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहणेही कठीण झाले. त्यांचे मानेवरील केस रक्ताने माखले होते.

हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणार्‍या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले. त्यांचे स्तवन करण्यास कोणी धजेना, देवांनी मात्र त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. नरसिंहांचा राग शांत करणे गरजेचे होते, रागाने तप्त झालेल्या नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा सर्वांनी प्रल्हादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रल्हाद नरसिंहांकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला, तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहांची विनवणी करीत होता, हे प्रभू आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक ह्या नरसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले. नंतर प्रल्हादाला अनेक आशीर्वाद देऊन देव निघून गेले.

गुरू:शरणम्

05/05/2020

नमस्कार🙏
लॉक डाऊन च्या या काळात अनेकांचे कुलधर्म कुलाचार धार्मिक विधी करायचे राहून जात आहेत.. या सर्वांना सुलभ रीतीने सर्व विधी पार पाडता येतील या कारणे आम्ही ऑनलाईन व्हिडिओ conference च्या
साहाय्याने आपल्याला सेवा कार्य देत आहोत ..
zoom cloud WhatsApp इत्यादी विविध प्रकारे आपण संपर्क करू शकता..
*पंडित रविराज गुरुजी*
9850053996

14/12/2019

🌞 !! वयं देवानां पुरोहिताः!!🌞
*तुमच्या राशीनुसार आहार घ्या, सशक्त व्हा!*
आपली सर्व शास्त्र आपल्या शरीर शास्त्रानुसार बनवली गेलेली आहेत असं मला वाटतं. पंचमहाभूतांनी व्याप्त असं आपलं ब्रम्हांड आणि तसंच आपलं शरीर. ही शरीर रचना समजायची एक पद्धत म्हणजे – आपण काय काळजी घेतली म्हणजे शरीर सुदृढ राहील ह्याच्या काही टिप्स देणार आहे.

पूर्वीच्या काळी वैद्य जेव्हा रुग्णाला औषधे देत असत तेंव्हा रुग्णाची राशी आणि नक्षत्र विचारात असत. ह्या राशीवरून आणि नक्षत्रावरून रुग्णाची नैसर्गिक शरीर रचना कशी आहे ते क्षणात लक्षात यायचे आणि त्याप्रमाणे औषधोपचार केला जायचा. जर अग्नितत्वाची प्रकृती असेल तर त्याप्रमाणे औषधं दिली जायची. नाहीतर हल्ली सर्व रोगांना एकाच पद्धतीचे औषध दिले जाते आणि अग्नितत्वाच्या रुग्णांना ह्या औषधांनी उष्णता वाढते. (तोंड येतं,पित्त वाढतं इ. ) मग ह्या उष्णतेवर पून्हा दुसरे औषध घ्यावे लागते. त्यापेक्षा आधीच जर रुग्णाची प्रकृती समजून घेतली तर त्याप्रमाणे उपचार करता येतील आणि रुग्णाला त्रास होणार नाही. बघा विचार करून.

आपल्या सर्व बारा राशी चार तत्वांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ही चार तत्व म्हणजे -अग्नितत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि जलतत्व.

_*अग्नितत्व राशी –*_ मेष,सिंह आणि धनु

_*पृथ्वीतत्व राशी –*_ वृषभ, कन्या आणि मकर

_*वायुतत्व राशी –*_ मिथुन,तूळ आणि कुंभ

_*जलतत्व राशी –*_ कर्क,वृश्चिक आणि मीन

*अग्नितत्व -:* अग्नितत्वचा संबंध आपल्या शरीरातील उष्णतेशी आहे,आपल्या पोटातील अग्निशी आहे. अग्नितत्वाची लग्नरास असेल तर अशा व्यक्तिंमध्ये शारीरिक उष्णता अधिक आढळून येते. त्यांचे हाताचे तळवे नेहेमी गरम असतात. ह्या व्यक्तिंना घामही खूप येतो. ह्यांची उंची आणि शरीराची रुंदी व्यवस्थित असते. बांधेसूद असतात. मेष,सिंह आणि धनु ह्या राशी मुळातच दुसऱ्यांवर अधिकार गाजवणाऱ्या आहेत. ह्यांच्यावर कोणी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तो सहन होत नाही आणि म्हणूनच ह्या राशीच्या व्यक्तिंना नोकरीत जास्त त्रास होतो. ह्यांचा कल व्यवसाय करण्याकडे जास्त असतो. ह्या व्यक्तिंना रागही खूप येतो.

अग्नितत्वाचा संबंध पोटाशी म्हणजेच पचनक्रियेशी आहे. हे तत्व बिघडले तर पचनक्रिया बिघडू शकते. आपल्या शरीरातील Blood Circulation चा संबंध अग्नितत्वाशी आहे. हे Circulation थांबले म्हणजे शरीर थंड पडते परिणामी मृत्यूच. शरीरातील उष्णता फार वाढू देऊ नये किंवा ती कमी होता काम नये. उष्णता वाढली म्हणजे पित्त खवळणार. म्हणून ह्या लोकांनी पाण्याचे प्रमाण वाढवावे. प्रमाण वाढवायचे म्हणजे काय करायचं ? तर पाणी युक्त आहार घायचा.

काकडी,कलिंगड,टरबूज,टोमॅटो, हिरव्या भाज्या ह्याचा आहारात अवलंब करावा. सब्जाचं पाणी,वाळ्याचे पाणी पिणे. दुर्वांचा -बेलाच्या पानांचा रस पिणे. (अर्थात हे सर्व तुमच्या डॉक्टरांना विचारून )

पिवळ्या गोष्टी म्हणजेच – पपई,भोपळा,तिखट चमचमीत पदार्थ ह्याचे प्रमाण कमी असावे. पांढऱ्या गोष्टींचा समावेश आहारात असावा. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे.

सकाळी आणि संध्याकाळी जमल्यास अनवाणी पायांनी बागेत हिरव्या गवतावरून चालावे.

*पृथ्वीतत्व –:* पृथ्वीतत्व म्हणजे शारीरिक ताकद साठवणे. ह्या राशीच्या व्यक्ति फार आजरी पडत नाहीत परंतु ह्यांचे आजार दीर्घकाळ चालणारे असतात. पृथ्वीतत्वाच्या अंमलाखाली खांदे -मान, आतडी आणि गुडघे येतात. ह्या व्यक्तिंचा बांधा फार सडपातळ किंवा बांधेसूद नसतो. तब्येत सांभाळून असतात. ह्यांना धर्माचे अवडंबर माजवलेले आवडत नाही. देवळात जाणे, धार्मिक विधी ह्या सगळ्याला त्यांचा विरोध असतो. जीवनाबद्दल “Practical” विचार असतात. अत्यंत मुडी असतात. वृषभ,कन्या आणि मकर ह्या राशी पृथ्वीतत्वाखाली येतात. ह्या राशींपैकी मकर ही रास फार “Social” नसते. आपण भले आणि आपले काम भले अशी वृत्ती असते. वृषभेला स्वतःची स्तुती करून घ्यायला फार आवडते तर कन्येला व्यवसायात फार रस असतो. ह्या तिन्ही राशींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यांना पैसे कसे कामवावेत ह्याचा नैसर्गिक sense असतो. परंतु ह्या व्यक्ति लवकर सगळ्यांमध्ये मिसळू शकत नाहीत. हे फार “expressive” नसतात.

ह्यांना होणार त्रास मुख्यत्वे आतड्यांचा असतो. त्यांनी आपले Diet व्यवस्थित पाळले आणि रोज थोडे चालणे ठेवले तर प्रकृती ठणठणीत राहील. ह्या व्यक्तिंना वाताचा त्रास असतो. म्हणून थंड पदार्थ, शिळे पदार्थ घेऊ नयेत. आता शिजवले आता जेवलो हा कानमंत्र सुट्टीच्या दिवशी तरी पाळावा. कोमट पाणी थंडीच्या दिवसात घ्यावे. पचनक्रिया सक्रिय राहील असा आहार घ्यावा. चालणे जरूर असावे.

*वायुतत्व –:* वायुततत्वाच्या राशी म्हणजे मिथुन,तुळ आणि कुंभ. ह्या तत्वाखाली येणारे शरीराचे अवयव म्हणजे – फुफ्फुसे, पोटाच्या नाभीखालील भाग,मूत्रपिंड आणि पोटऱ्या/पाय. ह्या व्यक्ति स्थूल असतात. आहार इतका नसतो परंतु वजन जास्त असते. वजन जास्त असले तरी बलवान नसतात. ह्या राशींची बुद्धिमत्ता इतर राशीपेक्षा उच्च कोटीची असते. परंतु बुद्धीचा चांगला वापर झाल्यास अशा व्यक्ति आयुष्यात पुढे येतात. आयुष्यात “success” जर मिळाला नाही तर मात्र मानसिक आजाराशी ह्यांना झगडावे लागते.
ह्यांचीं प्रकृती “sensitive” असते म्हणजे ह्यांना वातावरणातील बदल लगेच समजून येतो. ह्यांना ऍलर्जी लगेच होते. वातावरणात जरा बदल झाला की खोकला होणे,सर्दी होणे,त्वचेवर पुरळ उठणे ह्या गोष्टींचं त्रास होतो. नुसता वातावरणातील बदलामुळेच ह्यांना त्रास होतो असे नाही तर ह्यांच्यासाठी काही खाण्याचे पदार्थही ऍलर्जिक असतात. अशा पदार्थांचा अवलंब टाळलेला बरा . ह्यांना सांधे दुखीचाही त्रास असतो.

ह्यांनी आपल्या आहारात खालीलप्रमाणे बदल करावेत – एकाचवेळी जेवून घेऊ नये. थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने खात रहावे. म्हणजे अन्न व्यवस्थित पचेल. पोटऱ्यांना “Cramps” येत असतात. विशेषतः थंडीत झोपण्याआधी पायांना राईच्या तेलाने मालिश करावे आणि कोमट पाण्याने शेक द्यावा म्हणजे “Cramps” येणार नाहीत. योगासने शिकून घ्यावीत. श्वसनसंस्थेशी निगडीत आसने करावीत. ओंकार साधना करावी. त्याने नक्की फरक दिसून येईल.

*जलतत्व –:* जलतत्व नावातच जल म्हणजे पाणी आहे. ह्या व्यक्ति अत्यंत भावुक असतात. सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या व्यक्ति म्हणजे कर्क,वृश्चिक आणि मीन. त्यांच्या ह्या स्वभावामुळे घरातील इतर व्यक्ति ह्यांच्यावर नाराज असतात. हे स्थुल प्रकारात मोडतात आणि बांधेसूद म्हणता येईल अशी शरीररचना अजिबात नसते. सतत काही ना काही विचार सुरूच असतात. विचार करता करता डोळ्यातून अश्रू ढाळणे हे चालूच असते. त्यामुळेच ह्यांना सर्दी खफाचा त्रास असतो. लहानपणी लक्ष न दिसल्यास निमोनियाचा त्रास होतो. अन्न पचत नाही आणि आतड्यांचा त्रास होत असतो. जितक्या व्यक्तिंना “Piles” किंवा आतड्यांचा त्रास झालेला आहे त्यांनी आपल्या कुंडलीतील वृश्चिक रास तपासावी. त्या राशीत चंद्र किंवा मंगळ असणारच. पायाचे तळवे सतत दुखत असतात. दुसऱ्यांसाठी सतत पळापळ असते मग पायाचे तळवे दुखणे आलेच की !!!

ह्यांना शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त असतो. मानसिक त्रास म्हणजे सततच्या विचारांनी होणारी डोकेदुखी, धावपळीने स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता येणे. मग ह्या धावपळीचा परिणाम म्हणजे ह्या व्यक्ति दीर्घकाळासाठी आजारी असतात. त्यांच्या ह्या आजारात सर्वांनी यावे त्यांना भेटावे ही माफक इच्छा त्यांची असते. परंतु सर्वांना इतका वेळ मिळेलच ही शाश्वती नसते. मग ह्यांचे मन अजून खट्ट होते की – मी सर्वांसाठी धावाधाव करते परंतु माझ्यासाठी कोणाकडे वेळ नाही. काय पटतंय का ?
ह्यांनी आहारकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. जेवतांना मोबाईल,टी.व्ही. बंद असावा. हिंदी -मराठी सिरिअल्स बघूच नये. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवून कार्य करू नये.

आहारात थंड गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. थंड पाणी,कोल्ड ड्रिंक्स अजिबात घेऊ नयेत. भात आणि भाताचे प्रकार टाळावेत. पिवळ्या वस्तूंचा आहारात समावेश असावा जसे की – पपई, भोपळा, गहू, उडीद, मूग, संत्र, मोसंबी.
रोज सकाळी, meditation केल्यास प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

वर दिलेली माहिती ही फक्त राशीप्रमाणे आहे. राशी म्हणजे कुंडलीचा १०% भाग. वर दिलेला आहार हा तुमच्या डॉक्टरांना विचारून अवलंबणे. प्रत्येक व्यक्ति भिन्न आहे त्यामुळे त्याचा आहार वेगळा असतो..
सात्विक,आहार घेतल्यास, विचार पण सात्विक येतात व मनाची एकाग्रता लवकर येते. व साधना चांगली होते.
---------------------------------------
🌞श्री.पं रविराज गुरुजी🌞
वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र धार्मिक विधी
कार्यालय~ दौलत सोसायटी १/२ मॅकडोनल्ड जवळ , करिष्मा चौक कर्वे रोड पुणे३८ 🕰वेळ~ दु. 2ते5 कार्यालयीन सुटी~सोमवार
📲संपर्क ९८५००५३९९६

Address

Pune

Opening Hours

Tuesday 2pm - 5pm
Wednesday 2pm - 5pm
Thursday 2pm - 5pm
Friday 2pm - 5pm
Saturday 2pm - 5pm
Sunday 2pm - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धार्मिक विधी ,कुंडली ज्योतीष आणि वास्तुशास्र मार्गदर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share