16/09/2024
#हर्षोद्योग_सूत्रं : उद्योगातली जनरेशन गॅप
16.09.2024
तुम्हीही ही चूक करत नाही आहात ना?
आजची माझी प्रश्नार्थक पोस्ट थोडी वेगळी आहे. अर्थात स्टार्ट अप आणि उद्योजकतेच्या संबंधीतच आहे.
पण तरुणाई साठी नाही तर थोड्याश्या वयानी मोठया माझ्या मित्रगणांना addressed आहे.
आजच्या स्टार्ट अपच्या युगामध्ये , कोणत्याही वयात, सगळ्यांनाच स्वतःचं असं काहीतरी उभ करावं, छोटा का होईना उद्योग असावा असं वाटतं आणि त्यात चुकीचं काहीच नाही.
पण बरेचदा मला माझ्या व्यवसायामुळे होणाऱ्या तरुणाईबरोबरच्या संवादातून हल्ली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे.
गेल्या चार-पाच वर्षांमध्ये झालेल्या सुधारणांचा परिणाम आहे की हल्ली जवळपास सगळेच त्यांच्या मनातल्या मनात उद्योग उभा करायचा विचार करतात,
आणखीन यात वयानी मोठया माझ्या काही मित्रगणांच्या एक नकळत होणारी चूक घडते आहे, काही वेळा नक्कीच... ती म्हणजे उद्योग तर करायचाय मला, पण माझी अपेक्षा अशी असते तो उद्योग उभा करायला मला माझा मुलगा, भाऊ , मित्र अशा कोणीतरी जवळच्यानी मदत करावी. आणि त्या आपल्यापेक्षा वयाने तरुण असलेल्या मुलाने/मुलीने तुमच्या मनातील उद्योग उभा करावा अशी अपेक्षा त्या तरुण मुलाचे वडील, काका किंवा वयाने मोठे असलेले पण तो धंदा कंट्रोल करू पाहणारे (म्हणजे रोजचा निर्णय घेण्याची ज्यांची इच्छा असते ) असा वरीष्ठ व्यक्ती त्या तरुणांच्या जोरावर resource वर , तो व्यवसाय धंदा किंवा उद्योग त्या तरुणाई बरोबर चालू करतो. तरुण व्यक्तीने तो उद्योग पहावा तरच व्यवस्थापन करावं हे अपेक्षित असते.
बरेचदा किंवा मी असं म्हणेन की कधीच त्या तरुण व्यक्तीला जो त्या उद्योगाच व्यवस्थापन पाहतोय त्याला विचार स्वातंत्र्य कृती स्वातंत्र्य दिलं जात नाही आणि मग असं होतं की जो उद्योग ज्या पद्धतीने उत्तम व्हायला पाहिजे तो तसा न होता त्या पार्ट टाइम वरिष्ठ माणसाच्या ' मूड आणि फॅन्सी 'म्हणजे वैयक्तिक त्यांच्या आवडीनिवडी आणि विचार यावर अवलंबून असतो.
आणि मग होतं असं की जो तरुण उद्योजक किंवा मॅनेजर त्या उद्योगाच 24 तास नियोजन करत असतो, त्याचा विचार उद्योग व्यवस्थापनासाठी किंवा व्यवसायाचे निर्णय घेताना घेतला जात नाही.
तसेच या तरुण व्यक्तीला नक्की काय हवे आहे? त्याला नक्की हाच उद्योग ज्या पद्धतीने करायला सांगितलं जातोय त्याच पद्धतीने केला तर आवडतय का ? त्यात त्याचे शंभर टक्के तो तरुण देतोय का? याचा विचार वरिष्ठ भागीदाराकडून /बॉसकडून किंवा आजच्या भाषेत काही अंशी बोलायचं झालं तर उद्योगातल्या "इन्वेस्टर " कडून केलाच जात नाही. उलटपक्षी आपले निर्णय त्या तरुण व्यक्ती वर लादले जाण्याची शक्यता 100 टक्के निर्माण होते. आणि मग निर्माण होते तो त्या उद्योगातली जनरेशन गॅप! परस्पर निर्णय घेतले जातात. संवाद संपून विसंवाद सुरू होतो.
आपल्यात दरी निर्माण होते आहे अशी वरीष्ठ व्यक्तीची भावना व्हायला लागते..... आणि पूर्वी तरुणाई कदाचीत याबद्दल न बोलता आदरयुक्त भीतीमूळे गप्प बसायची, घुसमटून! पण आता ते न होता त्या स्टार्टअप उद्योगात अंतर्गत विरोध सुरू होतो... आणि ती तरुणाई सरळसरळ पाठ फिरवून त्या त्याच्याच उद्योगातून बाहेर पडते... उलट बोलतच नाही पण घुसमट पण सहन करत नाही. दुसऱ्या संधीच्या मागे जातो.
वयानी मोठा असलेला निर्णय घेणारा व्यक्ती मग असलेला आधार संपल्यावर कदाचीत सिंहावलोकन करतो पण तोवर त्या उद्योगाचे खूप नुकसान होतं..... जाणारा वेगळी वाट करून खूप पुढे गेलेला असतो.
म्हणूनच उद्योगात सुदृढ अंतर्गत संवाद हवा.
शुभं भवतु!
हर्षवर्धन रानडे ©
biznovators.in
Please note : माझ्या अनेक न भेटू शकणाऱ्या उद्योजकांनी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या उद्योगमैत्रांनी खूप आग्रह केल्याने , मी माझ्या आगामी प्रकाशीत होणाऱ्या पुस्तकांत अशी काही प्रकरणे किंवा केस स्टडीज, विचार सादर करणार आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला त्याचा उपयोग होईल. लिखाणाचे सर्व IPR rights-हक्क माझे आहेत ह्याची कृपया नोंद घ्यावी.
लोभ असावा ही विनंती...
हर्षवर्धन रानडे