24/01/2026
स्वतःला ही थोडी जागा द्या!
मागच्या काही लेखांमध्ये आपण पाहिले की आपण सगळेच कुठेतरी धावत आहोत.
कामासाठी, कुटुंबासाठी, नात्यांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी.
दिवस संपतो, पण मन थांबत नाही.
विचार सुरूच असतात.
मनाची लगबग आणि विचाराची धावपळ.
आणि या धावपळीत एक व्यक्ती सतत मागे पडते
ती म्हणजे आपण स्वतः!
आपण इतरांसाठी वेळ काढतो,
सगळ्यांच्या गरजा ओळखतो,
सगळ्यांच्या भावना समजून घेतो,
पण स्वतःसाठी मात्र वेळ उरत नाही.
हळूहळू आपलं आयुष्य
“मी काय करतोय” यावर चालू राहतं
“मी कसा आहे” याकडे पाहायची फुरसतच राहत नाही.
स्वतःसाठी थोडी जागा ठेवणं
म्हणजे स्वार्थी होणं नाही...
तर स्वतःला जिवंत ठेवणं आहे.
कारण जो माणूस स्वतःशीच तुटलेला असतो
तो इतरांशी जोडलेला राहू शकत नाही.
आपण सतत मजबूत राहायचा प्रयत्न करतो
पण मजबूत असणं म्हणजे
नेहमीच सगळं सहन करणं बिलकुल नसतं.
आपण सुद्धा कधी तरी थकतो हे मान्य करणं,
कधी रडावंसं वाटतं हे स्वीकारणं,
कधी एकटं बसावंसं वाटतं हे समजून घेणं,
ही सगळी ताकदीचीच रूपं आहेत.
स्वतःसाठी थोडी जागा म्हणजे
दिवसातून काही क्षण,
जिथे कुणाकडून अपेक्षा नसतात,
जिथे कुणाला उत्तर द्यावं लागत नाही,
जिथे आपण फक्त आपण असतो.
ती जागा शांततेची असू शकते
एखाद्या पुस्तकात असू शकते
संगीतात असू शकते
नुसतं आकाशाकडे पाहण्यातही असू शकते.
ती जागा मोठी असण्याची गरज नाही
पण ती खरी असावी,
आपली असावी,
आणि मनापासून स्वीकारलेली असावी.
आपण अनेकदा
इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना
स्वतःच्या गरजा दाबून टाकतो.
“हे करायलाच हवं”
“हे नको केलं तर लोक काय म्हणतील”
“मी थांबलो तर सगळं थांबून जाईल”
असं म्हणत म्हणत,
आपण स्वतःला बाजूला ठेवतो
आणि हळूहळू आतून थकायला लागतो.
मनावरचं ओझं
एका दिवसात वाढत नाही,
ते न बोललेल्या गोष्टींमधून
दाबून ठेवलेल्या भावनांमधून,
आणि सतत स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे वाढत जातं.
स्वतःसाठी सुद्धा जागा ठेवणं
म्हणजे हे ओझं थोडं खाली ठेवणं.
हे मान्य करणं
की मला सगळं जमत नाही
मला सगळं परिपूर्ण करायचं नाही
मला कधी कधी थांबायचं आहे.
आपण अनेकदा
इतरांसाठी जेवढं सौम्य असतो
तेवढं स्वतःसाठी कठोर असतो.
चुकलो तर स्वतःला दोष,
थकलो तर स्वतःलाच दोष,
मागे पडलो तर स्वतःलाच दोष,
पण स्वतःसाठी जागा ठेवणं
म्हणजे स्वतःशी थोडं मृदू होणं.
मी प्रयत्न करतोय
मी शिकतोय
मी माझ्या परीने जगतोय
हे मान्य करणं.
आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही
तो एक प्रवास आहे.
आणि प्रवासात
थोडं थांबणं
दिशा बदलणं
आणि स्वतःला समजून घेणं
हे सगळं आवश्यक असतं.
स्वतःलाही थोडी जागा देणे
म्हणजे नात्यांपासून दूर जाणं नाही,
तर नात्यांमध्ये स्वतःला हरवू न देणं आहे.
ज्या नात्यात
तुम्हाला सतत बदलावं लागतं
स्वतःला दाबावं लागतं
नेहमीच कमी वाटावं लागतं
तिथे थोडं अंतर
हेच औषध असतं.
कारण शांतता म्हणजे,
भांडण नसणं नव्हे
तर आत गोंधळ नसणं हे आहे.
आज स्वतःला एवढंच विचारा
मी शेवटचा स्वतःसाठी
कधी वेळ काढला?
मी शेवटचे मन मोकळं कधी केलं
न सांगता,न समजावता
फक्त स्वतःशी बसून.
जर उत्तर मिळत नसेल
तर आजपासून सुरुवात करा.
दहा मिनिटं
पंधरा मिनिटं
पण फक्त तुमच्यासाठी.
फोनशिवाय
लोकांशिवाय
अपेक्षांशिवाय
फक्त तुम्ही
आणि तुमचं मन.
स्वतःसाठी थोडी जागा ठेवा
कारण तुम्ही शांत असाल
तरच तुमचं आयुष्यही
हळूहळू शांत व्हायला लागतं.
आणि लक्षात ठेवा
स्वतःची काळजी घेणं ही लक्झरी नाही,
ती गरज आहे.
स्वतःलाही थोडी जागा देणे
ही माणसाला पुन्हा स्वतःकडे परत आणणारी
सगळ्यात सुंदर जागा असते.
डॉ अमित मेढेकर